मुसळधार पावसामुळे संगमेश्वर-देवरुख मार्गावरील वाहतूक ठप्प
शाळांवर परिणाम, आठवडा बाजार परिसरात शिरले पुराचे पाणी
संगमेश्वर / दीपक भोसले :
सोमवारी रात्रीपासून संगमेश्वर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाले तुडुंब भरल्याने काही प्रमुख मार्ग जलमय झाले आहेत. संगमेश्वर–देवरुख मार्गावरील लोवले आणि बुरंबी या ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. कसबा–नायरी मार्ग आणि डिंगणी मार्गही बंद करण्यात आला आहे. परिणामी, शाळांकडे जाणारे विद्यार्थी अर्ध्या वाटेवरूनच माघारी परतले.
तालुक्यातील अनेक शाळांवर पावसाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प होती, तर काही शाळांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, संगमेश्वर येथील आठवडा बाजार परिसरात पुराचे पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
स्थानिक प्रशासन व आपत्कालीन पथक सतर्क असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.