For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अतिवृष्टीने 10 लाख टन उसाचे नुकसान

09:33 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
अतिवृष्टीने 10 लाख टन उसाचे नुकसान
Advertisement

23 हजार हेक्टरला फटका, कृषी-महसूल खात्याकडून पंचनामा

Advertisement

बेळगाव : जुलै महिन्यात झालेल्या अति पावसामुळे जिल्ह्यातील 23,772 हजार हेक्टर क्षेत्रातील सुमारे 10.69 लाख टन ऊस पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. विशेषत: कृष्णा, घटप्रभा, दुधगंगा, बळ्ळारी नाला व नदी काठावरील ऊस क्षेत्राचा यामध्ये समावेश आहे. कृषी खाते आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पंचनामा केला आहे. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई कधी आणि किती मिळणार? याबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे. जिल्ह्यातील अथणी, मुडलगी, गोकाक, निपाणी, कागवाड, चिकोडी, बेळगाव आदी भागात उसाचे क्षेत्र अधिक आहे. मात्र जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी आणि जलाशांच्या पाणी पातळीत वाढ होऊन फटका बसला आहे. काही ठिकाणी उसाचे पिक पाण्याखाली जाऊन पूर्णपणे कुजले आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांनाही उसाचे गळीप उद्दीष्ट पूर्ण करणे कठीण जाणार आहे. शेतकऱ्यांना बियाणे आणि खतासाठी आगाऊ दिलेल्या रकमेचीही वसुली कशी करायची? अशी चिंताही साखर कारखान्यांना लागली आहे.

ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता

Advertisement

यंदा झालेल्या अतिरिक्त पावसामुळे ऊस उत्पादनात 15 टक्के घट होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे 80 हजार हेक्टरमधील 40 लाख टन उसाचे नुकसान झाले होते. यंदा 23 हजार हेक्टरातील 10 लाख टन उसाचे नुकसान झाले आहे. कृषी खात्याने पंचनामा करण्याबरोबर नुकसान भरपाई तातडीने देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही नुकसानग्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

दहा दिवसात अहवाल 

जिल्ह्यात नद्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी कृषी आणि महसूल खात्याची सर्वेक्षणासाठी संयुक्त मोहीम सुरू आहे. नुकसानग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याच्या सूचना पथकांना देण्यात आल्या आहेत. याबाबतचा अहवाल दहा दिवसात प्राप्त होईल.

-मोहम्मद रोशन - जिल्हाधिकारी

Advertisement
Tags :

.