परतीच्या पावसाने पुन्हा झोडपले
दुपारपासून रात्री उशिरापर्यंत दमदार पाऊस : रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी
बेळगाव : परतीच्या पावसाने बुधवारीही शहराला झोडपले. विजांच्या कडकडाटासह दुपारनंतर झालेल्या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. जोरदार पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार असल्याने बळीराजा पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. मागील आठ दिवसांपासून बेळगाव शहरासह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. परतीच्या पावसाने जोरदार धडक दिल्याने सखल भागात पुन्हा पाणी साचू लागले आहे. वास्तविक, ऑक्टोबर महिन्यापासून पावसाचे प्रमाण कमी होते.
परंतु यावर्षी मात्र पावसाने जोर धरल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. जोरदार पावसामुळे रात्री उशिरा सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले. पावसाचा अंदाज न आल्याने छत्री, रेनकोट न घेता घराबाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली. बराच वेळ थांबूनदेखील पावसाचा जोर कमी होत नसल्याने अखेर भिजत घर गाठावे लागले. पावसामुळे सायंकाळनंतर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. जागा मिळेल त्याठिकाणी वाहने पार्किंग करून पाऊस जाण्याची वाट पाहणारे नागरिक हे चित्र सर्वत्र दिसत होते. पावसाचा जोर असल्याने सायंकाळनंतर बाजारपेठेत मात्र शुकशुकाट दिसून आला.
नोकरदार-विद्यार्थ्यांची गैरसोय
अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे विद्यार्थी तसेच नोकरदारांची गैरसोय झाली. बसची वाट पहात बस स्टॉपवर थांबलेल्या विद्यार्थ्यांना बस आल्यानंतर पावसात पळत जाऊन बस धरावी लागली. बस स्थानकापासून रेल्वेस्थानकापर्यंत चालत जाणाऱ्यांचीही धावपळ उडाली. त्यामुळे पावसाने आता विश्रांती घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत होती.