राधानगरीत दमदार पावसाला सुरुवात, धरणातून 1500 क्यूसेकने विसर्ग
राधानगरी :
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर अखेर पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. आज सकाळपासून संततधार पावसाला सुरुवात झाली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती, त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली होती. मात्र, आजच्या पावसामुळे पेरण्यांना गती मिळेल आणि शेतीची कामे पुन्हा रुळावर येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी राधानगरी धरणातून आज दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 400 ते 1500 क्यूसेकने विसर्ग सुरू केला जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
या विसर्गामुळे भोगावती व पंचगंगा नद्यांच्या काठच्या गावांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून, नदी-नाल्यांच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.