राज्यात 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज
विविध जिल्ह्यांमध्ये रेड, यलो, ऑरेंज अलर्ट : भारतीय हवामान खात्याची माहिती
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर
राज्यात पुढील पाच दिवस मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज वर्तवला असून 10 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस राहण्याची शक्मयता आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिली. पुढील 5 दिवसांत राज्यभरात हलका ते मध्यम पाऊस आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्मयता असून सोबत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा असेल.
8 जुलैपर्यंत किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तर दक्षिण अंतर्गत आणि मलनाड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्मयता आहे. परिणामी, काही जिल्ह्यांसाठी यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत. आयएमडीच्या अंदाजानुसार, कारवार, उडुपी आणि मंगळूर जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्मयता आहे. सखल भागातील आणि पूरग्रस्त भागातील रहिवाशांना अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, बेळगाव, शिमोगा, चिक्कमंगळूर, कोडगू, हासन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्मयता असून दक्षिण आणि उत्तर अंतर्गत भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. सततच्या पावसामुळे शहरी भागात पाणी साचण्यासह सखल भागात अचानक पूर येण्याची, डोंगराळ भागात भूस्खलन होण्याची आणि रस्ते वाहतुकीत व्यत्यय येण्याची शक्मयता आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला
कर्नाटकच्या किनारपट्टीजवळील अरबी समुद्र खवळल्याने मच्छिमारांना अंदाजित कालावधीत समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनांना पावसाशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक खबरदारीचे उपाय योजण्यास सांगण्यात आले असून संवेदनशील भागांमध्ये बचाव कर्मचारी आणि आपत्कालीन सेवा पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.