बिहार, उत्तर प्रदेशात पावसाचा जोर कायम
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशमध्ये लखनौ-वाराणसीसह 10 शहरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्याच्या बऱ्याच भागात पावसाचा जोर वाढल्याने सुलतानपूरमध्ये रेल्वे ट्रॅक पाण्यात बुडाला. बऱ्याच रस्त्यांवर दोन फुटांपर्यंत पाणी साचले असून सुलतानपूर येथील घरांमध्ये पाणी शिरले आहे. पुराची पातळी वाढत असल्याने एनडीआरएफ, एसडीआरएफला अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशप्रमाणेच बिहारमधील गंगा आणि कोसी नद्यांच्या उधाणामुळे कटिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील 57 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पाटणाच्या हथीदाहमध्येही गंगा नदी तुंडुंब भरून वाहत आहे. हवामान खात्याने मध्यप्रदेशसह आठ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्मयता वर्तवली आहे. तसेच उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यात रेड अलर्ट जारी केला आहे.
ओडिशातील पुरी येथे मुसळधार पावसामुळे कोणार्क सूर्य मंदिराचे प्रांगण जलमय झाले आहे. पुरी जिल्हा प्रशासनानेही सर्व शाळा बंद केल्या आहेत. 24 तासात येथे 1.5 इंच पावसाची नोंद झाली, भुवनेश्वरमध्येही 1 इंच पाऊस झाला.