आज, उद्या अतिवृष्टीचा इशारा
पणजी : काल सोमवारी गोव्यात ऑरेंज अलर्ट असताना देखील पावसाने विश्रांती घेतली. मात्र रविवारी पावसाने गोव्यातील जनतेची दाणादाण उडवली होती. गेल्या 24 तासात गोव्यात सरासरी पावणेचार इंच पाऊस पडला. यामुळे यंदाच्या मोसमात एक जूनपासून आतापर्यंत 19 इंच पावसाची नोंद झाली आहे. आज व उद्या ऑरेंज अलर्ट जारी करून अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रविवारच्या मुसळधार पावसामुळे गोव्यात अनेक ठिकाणी सायंकाळी पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती, मात्र रात्री उशिरा पावसाने आपला वेग कमी केला. त्यामुळे अनेक भागात धोक्याच्या पातळीवरून वाहणाऱ्या नद्या सकाळपर्यंत पूर्ववत वाहू लागल्या. सांखळी आणि डिचोली तसेच धारबांदोडा या भागात मुसळधार पडलेल्या पावसामुळे तेथील नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत पोचल्या होत्या, परंतु रात्री पावसाने थोडी उसंत घेतल्याने सकाळी नद्यांचा प्रवाह थोडा खाली उतरला.
रविवारी दिवसभरात अनेक भागांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले होते. मुसळधार पावसाने अनेक वृक्ष उन्मळून पडले. वीजपुरवठा देखील काही वेळेपुरता खंडित झाला. पावसाबरोबर वाऱ्याचा वेगही वाढला होता. हवामान खात्याने सोमवारी देखील मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिला होता तथापि ढगांनी वाऱ्याबरोबर उत्तरेच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्यामुळे पाऊस आता मुंबईपासून गुजरातपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामुळेच सोमवारी गोव्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. हवामान खात्याने आज, उद्या दोन्ही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे तथापि आजही पावसाचा वेग थोडा कमीच राहील असा अंदाज आहे. दि. 19 ते 22 जून या दरम्यान हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस धारबांदोड्यात
गोव्यात रविवारी सर्वत्र मुसळधार पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस धारबांदोडा येथे 6.5 इंच पडला. वाळपईत 5.5 इंच, सांखळीत 5 इंच, फोंडा, म्हापसा व पेडणे येथे प्रत्येकी 4.5 इंच, काणकोण 4 इंच, जुने गोवे 3.50 इंच, केपे 3.50 इंच, सांगे 3 इंच, मुरगाव 1.50 इंच, तर दाबोळी येथे 1.25 इंच पाऊस पडला.पुढील चार दिवस वाऱ्याचा वेग ताशी पन्नास किलोमीटरपर्यंत राहील. त्यामुळे समुद्र खवळलेला असेल. यासाठीच पारंपरिक मच्छीमारांनी आपल्या होड्या घेऊन समुद्रात जाऊ नये, असा इशारा पणजी वेधशाळेने दिला आहे.