राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
28 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट तर 29 मे पासून 1 जूनपर्यंत येलो अलर्ट जारी
पणजी : आगामी 24 तासात गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सोमवारपासून 28 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर 29 मे पासून एक जूनपर्यंत राज्यात येलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या 24 तासात गोव्यात सर्वाधिक पावसाची नोंद पेडणे येथे सुमारे तीन इंच झाली, तर सर्वात कमी पाऊस वाळपईमध्ये झाला. तिथे केवळ पाऊण इंच पाऊस पडला. आतापर्यंत मान्सूनपूर्व पावसाची नोंद गोव्यात 21 इंच झाली आहे. गोव्यात सोमवारी मान्सून पुन्हा सक्रिय झाला. गेल्या 24 तासात दोन इंच पावसाची सरासरी नोंद झाली.
सायंकाळी उशिरा गोव्यात जोरदार पाऊस आला. रविवारी दिवसभरात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला होता, परंतु रात्री उशिरा सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. पुढील 24 तासांमध्ये गोव्यात जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज पणजी वेधशाळेने वर्तविला आहे. सध्या महाराष्ट्रात मान्सून आक्रमक झालेला आहे. तसेच मराठवाड्याच्या दरम्यान कमी दाबाचा जो पट्टा निर्माण झालेला आहे त्याचा प्रभाव गोव्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आगामी 48 तासात गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा पणजी वेधशाळेने दिला आहे.
सरासरी दोन इंच पावसाची नोंद
रविवारी सकाळी आठ तीस ते सोमवारी सकाळी आठ तीस यादरम्यान गोव्यात दिवसभरात सरासरी दोन इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. पेडणे येथे जवळपास तीन इंच, फोंडा व मुरगाव येथे प्रत्येकी अडीच इंच, म्हापसा, मडगाव, धारबांदोंडा, केपे, जुने गोवे, पणजी, सांखळी या ठिकाणी प्रत्येकी दोन इंच पावसाची नोंद झाली. दाबोळी, सांगे येथे प्रत्येकी पावणे दोन इंच, काणकोण येथे एक इंच तर वाळपई येथे पाऊण इंच पावसाची नोंद झाली. यामुळे मान्सूनपूर्व पावसाची नोंद आतापर्यंत 21 इंच एवढी झाली.
जरी मान्सून असला तरी मोसमी पाऊस एक जूनपासून गृहीत धरला जाईल
दरम्यान यंदा साधारणत: 15 मे पासून गोव्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला आणि प्रत्यक्षात मान्सून 25 रोजी गोव्यात पोचला, असे असले तरी देखील 31 मे पर्यंत पडलेला पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस म्हणूनच गृहीत धरला जाणार आहे. मोसमी पाऊस हा एक जूनपासून गृहीत धरला जाईल. त्यामुळे समजा 31 मे पर्यंत गोव्यात 30 इंच पाऊस जरी झाला तरी देखील मासमातील पावसामध्ये त्या नोंदीचा समावेश केला जाणार नाही, अशी माहिती पणजी वेधशाळेच्या सूत्रांनी दिली. सध्या पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व म्हणूनच नोंदविला जाईल.