अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा;गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात यलो अलर्ट
शनिवार ते सोमवार मुंबईत पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच, हवामान खात्याने गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर पुढील आठवड्यात दक्षिण राजस्थान आणि मध्य प्रदेशात पाऊस पडू शकतो. शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्रातील ठाणे, पालघर आणि रायगडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून त्यामुळे अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडू शकतो. तमिळनाडू आणि केरळमध्ये आधीच मुसळधार पाऊस पडत आहे. तामिळनाडूमध्ये तर राजधानी चेन्नईतील शाळाही मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आल्या आहेत. तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्येही वादळ येण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार, रविवारी हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टी होऊ शकते. हिमाचलच्या उंच डोंगराळ भागात बर्फवृष्टी अपेक्षित आहे, त्यामुळे मैदानी भागातही थंडी वाढू शकते. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच तापमान आणखी खाली येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. काश्मीरमध्ये सध्या धुके असून पुढील काही दिवस असेच राहण्याचा अंदाज आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पुढील आठवड्यात हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.