राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा
येलो अलर्ट जारी, धरणांमध्ये मुबलक साठा
त.भा. विशेष प्रतिनिधी
पणजी : पावसाने बराच जोर धरला असून राजधानी पणजीसह संपूर्ण गोव्याला बुधवारी झोडपून काढले. हवामान खात्याने आज गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून येलो अलर्ट जारी केला आहे.
गेल्या 24 तासांमध्ये गोव्यात दीड इंच पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर राज्यातील धरणांमध्ये आता मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तसेच वाढत्या पावसामुळे यंदा पावसाची तूट जी वाढली होती ती आता पुन्हा एकदा खाली आली असून ती 36 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
गोव्यात मान्सून सक्रिय झाला आहे आणि त्यामुळेच गेले दोन दिवस गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस चालू आहे. बुधवारी पणजीसह राज्यभरात सर्वत्र अधूनमधून मुसळधार पाऊस पडणे चालूच होते. त्याचबरोबर जोरदार वादळी वारे देखील पावसाबरोबरच येत होते. ही परिस्थिती अशीच राहणार असून हवामान खात्याने आज संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस पडणार असे जाहीर केले आणि येल्लो अलर्ट जारी केला. धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये तसेच त्याच्या पायथ्याशी मुसळधार पाऊस आला. सांगेमध्ये सर्वाधिक साडेतीन इंच पावसाची नोंद झाली. केपेमध्ये सव्वातीन इंच पाऊस पडला. धारबांदोडा या ठिकाणी दोन इंच, साखळीमध्ये पावणेदोन इंच, पेडणे, काणकोण, जुने गोवे येथे प्रत्येकी दीड इंच पावसाची नोंद झाली. मुरगावमध्ये एक इंच, पणजी व म्हापसा येथे प्रत्येकी अर्धा इंच तर फोंडा व दाबोळी येथे प्रत्येकी एक सेंटीमीटर पेक्षा कमी पावसाची नोंद झाली.
आतापर्यंत गोव्यात यंदाच्या मोसमात पडलेल्या पावसाची नोंद 42 इंच झाली आहे. पणजीत सकाळपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची नोंद एक सेंटिमीटर एवढी झाली आहे. हवामान खात्याने सायंकाळी जारी केलेल्या पत्रकानुसार आज सायंकाळपर्यंत येलो अलर्ट राहील. गोव्यात मुसळधार पावसाबरोबरच जोरदार वादळी वारे वाहतील, असा इशारा दिला आहे. 28 जुलैपर्यंत गोव्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.