आजपासून जोरदार पावसाची शक्यता
पणजी : राज्यात आजपासून 15 ऑगस्टपर्यंत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस दरवर्षी कोसळतो परंतु यंदा ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. गेल्या 24 तासात गोव्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. केवळ पावसाचे दिवस आहेत म्हणून पाऊस पडतो की काय अशी स्थिती सध्या आहे. पणजीमध्ये केवळ तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कर्नाटकाच्या भागात जोरदार पाऊस पडत असून तो गोव्याच्या दिशेने सरकत आहे. 15 ऑगस्टपर्यंत हवामान खात्याने जोरदार मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. यंदा मान्सून सुरू होण्याअगोदर सुमारे 30 इंच पाऊस पडला आणि एक जूनपासून आतापर्यंत सुमारे 65 इंच पावसाची नोंद झाली आहे. एव्हाना वार्षिक सुमारे 100 इंच पावसाची नोंद होत असे, यंदा मात्र सरासरीपेक्षा दहा टक्के पावसाचे प्रमाण घटले आहे.