मुसळधार पावसाने झोडपले
जनजीवन विस्कळीत : 5 जुलैपासून पुनर्वसु नक्षत्राला होणार सुरुवात
बेळगाव : मुसळधार पावसाने बुधवारी रात्री, तसेच गुरुवारी दुपारपर्यंत झोडपून काढले. पावसामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले असून सायंकाळनंतर पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली. मात्र, ग्रामीण भागात गुरुवारी काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. 22 जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली आहे. शुक्रवार दि. 4 जुलै रोजी आर्द्रा नक्षत्र संपणार असून या नक्षत्राने जोरदार सलामी दिली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्याचबरोबर शहराला पाणीपुरवठा करणारा राकसकोप जलाशयदेखील तुडुंब भरला आहे. अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू असून पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. मात्र, यामुळे मार्कंडेय नदीला पूर येण्याचा धोका असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवार दि. 5 जुलैपासून पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात होणार आहे. या काळातदेखील जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने वातावरण गारठले असून बाजारपेठेवरही परिणाम दिसून आला.