मुसळधार पावसाने झोडपले
पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार
पणजी : मुसळधार पावसाने गोव्याला गुरुवारी झोडपून काढले. बुधवारी दिवसभर अधूनमधून पाऊस पडत होता. रात्री उशिरा पावसाची संततधार चालूच राहिली. पावसाचा हा जोर पुढील 4 दिवस राहील. हवामान खात्याने या दरम्यान एलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या 24 तासांत म्हापसा व पेडणे येथे प्रत्येक 3.50 इंच पावसाची नोंद झाली. केपे येथे सव्वातीन इंच, पणजीतही सव्वातीन इंच पाऊस पडला. जुने गोवे येथे 3 इंच, मडगाव 2.50 इंच, दाबोळी येथे पावणेतीन इंच, सांखळीत 2.50 इंच, सांगे येथे 2.50 इंच, मुरगावमध्ये 2.50 इंच, धारबांदोडा येथे पावणे दोन इंच, काणकोण व फोंडा येथेही प्रत्येकी पावणे दोन इंच पाऊस पडला. गोव्यात गेल्या 24 तासांमध्ये सरासरी 2.50 इंच पावसाची नोंद झाली तर सरासरी यंदाच्या मोसमात 86 इंच पाऊस आतापर्यंत पडलेला आहे. धारबांदोडा, सांगे, केपे, वाळपई या चार केंद्रावर पावसाने यापूर्वीच शतक ठोकलेले आहे.