कुमठ्याजवळ पुन्हा दरड कोसळली
कारवार जिल्ह्यात मुसळधार पाऊस : नागरिक चिंताग्रस्त
कारवार : कुमठाजवळच्या बर्गी येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर गुऊवारी दरड कोसळली आहे. पहिल्यांदा दरड कोसळण्याचे प्रमाण कमी असल्याने एका बाजूने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तथापि आता दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवित हानी झालेली नाही. दरड हटविण्यासाठी आयआरबी बांधकाम कंपनी कामाला लागली आहे. तसेच देवगीरा ग्राम पंचायतीच्या क्षेत्रातील होळगद्दे येथेही राष्ट्रीय हमरस्तावर दरड कोसळली असून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
गुऊवारी सकाळी 8.30 वाजता चोवीस तासात जिल्ह्यात एकूण 1170 मि.मी. आणि सरासरी 98 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात अंकोला येथे 131 मि.मी., भटकळ 125, दांडेली 92, होन्नावर 98, जोयडा 82, कुमठा 128, हल्ल्याळ 69, कारवार 64, मुंदगोड 42, सिद्धापूर 145, शिरसी 105 आणि यल्लापूर 87 मि.मी. पाऊस झाला आहे. इतके दिवस जिल्ह्यातील हल्ल्याळ आणि मुंदगोड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत होता. तथापि, आता या दोन्ही तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे.
कद्रा जलाशयातून मोठा विसर्ग
कोळी नदीवरील कद्रा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस होत आहे. त्यामुळे या धरणात 30 हजार 523 इते पाणी वाहून येत आहे. या धरणातील कमाल पाणी पातळी 34 मीटर इतकी आहे. तथापि जिल्हा प्रशासनाने कमाल पाण्याची पातळी 30 मीटर इतकी निश्चित केली आहे. आज अखेर ही पातळी 30.05 मीटर इतकी झाली आहे. त्यामुळे धरणाचे 8 दरवाजे उघडून आणि विद्यात जनित्रातून 61 हजार क्युवेसक्स इतक्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला येत आहे. परिणामी काळीनदीच्या काठावरील (कारवार ता.) जनतेला सतर्क राहण्याचा आणि प्रसंगी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण यापूर्वी कद्रा धरणातील विसर्गामुळे अनेक संसार उद्धवस्त झाले आहेत.
जिल्ह्यात कोणताच रस्ता सुस्थितीत नसल्याची भीती
अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे जिल्ह्यात कोणताच रस्ता सुस्थितीत राहिलेला नाही. परिणामी वाहतूक खोळंबली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कारवार-यल्लापूर-इलकल रस्त्यांवर, होन्नावर-बेंगळूर रस्त्यावर, कुमठा-शिरसी रस्त्यावर, कारवार-मंगळूर रस्त्यावर दरडा कोसळण्याची मालिका सुरूच आहे. तर गुरूवारी बळगाव-पणजी हमरस्त्यावरील अनमोडपासून 12 कि.मी. अंतरावरील गोवा हद्दीत दूधसागर स्वामी मंदिराजवळ दरड कोसळली आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष करुन वाहन चालकांनी सतर्क राहाण्याची वेळ आली आहे.
दोन व्यक्तींचा मृत्यू
दरम्यान जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पावसामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अंकोला आणि होन्नावर तालुक्यातील प्रत्येकी एक व्यक्तीचा समावेश आहे. जिह्यात एकूण 18 गंजी केंद्रे सुरू करण्यात आली असून 2055 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
शाळांना आज सुटी
हवामान खात्याने कारवार जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असल्याने शुक्रवार दि. 19 रोजी संपूर्ण जिल्ह्यातील शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मी प्रिया यांनी सुटी जाहीर केली आहे.
आणखी दोन मृतदेह सापडले
अंकोला तालुक्यातील शिरुर येथील दुर्घटनेतील गुऊवारी आणखी दोन मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता सहावर पोहोचला आहे. तर दुर्घटना घडलेल्या दिवशीच म्हणजे मंगळवारी चार मृतदेह सापडले होते. गेल्या मंगळवारी अंकोला तालुक्यातील शिरुर येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर दरड कोसळून काही व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले. तर अन्य काही व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्यातून गंगावळी नदीत वाहून गेल्या. घटनास्थळापासून सुमारे 30 ते 40 कि.मी. अंतरावरील मंजगुणी-गोकर्ण येथे अवंतिका नाईक या बालिकेचा गुऊवारी मृतदेह आढळून आला.
तर गोकर्ण जवळच्या गंगेकोळ्ळ समुद्र किनाऱ्यावर एका अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह क्वॉरी चालकाचा किंवा क्लिनरचा असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी गंगावळी नदीत बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणाच्या एसडीआरएफ पथकाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप पाच ते सहा जण बेपत्ता आहेत. तर कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल यांनी या दुर्घटनेमुळे 15 हून अधिक लोक बेपत्ता असल्याचा पुनरुच्चार केला. मंगळवारी विधानसभेत बोलताना सैल यांनी शिरुर दुर्घटनेत 10 ते 15 बेपत्ता असल्याचा दावा केला होता.
शोध कार्यात अनेक अडचणी
29 जवानांचा समावेश असलेल्या एनडीआरएफच्या आणि 34 जवानांचा समावेश असवलेल्या एसडीआरएफच्या पथकाकडून घटनास्थळी आणि गंगावळी नदीत बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. तथापि मुसळधार पावसामुळे गंगावळी नदीच्या प्रवाहात सातत्याने वाढ होत असल्याने आणि गंगावळी नदीच्या प्रवाहाबरोबर झाडे वाहून येत असल्यामुळे शोध कार्यात अनेक अडचणी येत आहेत. गंगावळी नदीतील पाणी वाहण्याचा वेग इतका जोर आहे की पात्रात होड्या चालविणे जिकिरीचे बनले आहे, असे एसडीआरएफच्या पथकाने सांगितले.
केवळ 100 मीटर मातीचा ढिगारा हटविण्यात यश
दरड कोसळल्यानंतर राष्ट्रीय हमरस्त्यावर आलेल्या मातीच्या ढिगाऱ्याचे प्रमाण इतके मोठे आहे की गेल्यातीन दिवस केवळ 100 मीटर माती हटविण्यात आली आहे. अद्याप 200 मीटर माती रस्त्यावर पडून आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. बेंझ कार ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर लॉरी मालकाने आपल्या मालकीची लॉरी ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची माहिती दिली.
टँकरमधील गॅस शिफ्ट करण्याचा प्रयत्न
मंगळूरहून गोव्याकडे गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकर दरड कोसळल्यानंतर गंगावळी नदीतून वाहून गेला आहे. घटना स्थळापासून 6 कि.मी. अंतरावर वाहून गेलेल्या टँकरमधील गॅस अन्य वाहनात शिफ्ट करण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून प्रयत्न केले जात आहेत. तथापि हे कार्य अतिशय अवघड आहे. शिवाय गॅस शिफ्ट करताना स्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे टँकरच्या दोन कि. मी. परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत.
घटनास्थळी जिऑलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या पथकाची भेट
शिरुर येथील दरड कोसळलेल्या स्थळाची गुरूवारी दिल्लीहून आलेल्या जिऑलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या पथकानी पाहणी केली. पथकाने ढिगाऱ्यातील माती आणि दगडांची पाहणी केली. या अगोदर ही पथकाने जिल्ह्यातील काही स्थळांची पाहणी केली होती आणि जिल्ह्यात 436 दरड कोसळण्याच्या संभावीत जागा निश्चित केल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते.
चालकांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत
मंगळवारी सापडलेल्या अज्ञात व्यक्तींची ओळख पटली असून तो चेन्नई येथील चालक आहे, असे स्पष्ट झाले आहे. चालकाच्या कुटुबियांना कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी 5 लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.