For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणकुंबी भागात धुवाधार पाऊस

10:57 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
कणकुंबी भागात धुवाधार पाऊस
Advertisement

दहा दिवसांत 941 मि. मी.पावसाची नोंद : हब्बनहट्टीतील मंदिर पाण्याखाली

Advertisement

वार्ताहर /कणकुंबी

जिल्ह्यातील अतिवृष्टीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकुंबी पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच-सहा दिवसापासून धुवांधार पाऊस पडत असून दि. 21 ते 30 जूनपर्यंत म्हणजे दहा दिवसांत 660.8 मिलीमीटर पावसाची नोंद कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात झाली आहे. कणकुंबी परिसरात मंगळवारी सकाळी 8 पर्यंत एकूण 941 मि. मी. पाऊस झाला आहे. दि. 21 जून रोजी 175 मिलीमीटर, 29 जून रोजी 102 मि. मी. तर बुधवारी 105 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. गेले तीन-चार दिवस धुवाधार पाऊस पडत असल्याने परिसरातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीच्या पात्रात असलेले श्री स्वयंभू मारुती मंदिर अर्धेअधिक पाण्याखाली गेले आहे.

Advertisement

कणकुंबी पाणलोट क्षेत्रात दोन दिवस असाच पाऊस झाला तर हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहे. फक्त बेळगावच नाही तर उत्तर कर्नाटकातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यादीमध्ये कणकुंबी आणि आमगावचा उल्लेख केला जातो. वर्षाकाठी कमीत कमी या ठिकाणी पाच ते सहा हजार मिलिमीटर पाऊस होत असतो. परंतु यावर्षी जून महिन्यात 660.8 मि. मी. पाऊस झाला आहे. जूनमध्येसुद्धा सरासरी हजार ते दीड-दोन हजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस होत असतो. आता आर्द्रा नक्षत्रातील दुसऱ्या चरणात मात्र पावसाने हिसका दाखवण्यास सुरुवात केली आहे. सध्या होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे खोळंबलेल्या कामांना चालना मिळालेली असून भाताची रोप लागवडीची कामे सुरू झाली आहेत. संततधार पावसामुळे मलप्रभा नदीचे उगमस्थान पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेले असून, परिसरातील सर्व नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

कणकुंबी भागात वीजपुरवठा खंडित

जांबोटीपासून चोर्लापर्यंत ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडल्याने गेल्या दोन-चार दिवसांपासून सर्वच गावांमध्ये वीजपुरवठा खंडित आहे. केवळ पाच-दहा मिनिटांसाठी येणारी वीज पुन्हा गायब होत असल्याने नागरिकांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे.

पावसाचं पाणी रस्त्यांवरून 

बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यावरील पावसाचे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. यावर्षी रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे. परंतु अद्याप कोणतीही सोय केली नसल्याने पावसाचे पाणी गटारीऐवजी रस्त्यावरूनच वाहत आहे. विशेषत: बैलूर क्रॉसपासून ते कुसमळीपर्यंत रस्त्याला दुतर्फा गटार असून देखील पावसाचे पाणी संपूर्णपणे रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनधारकांना पाण्यामधूनच कसाबसा प्रवास करावा लागत आहे.

Advertisement
Tags :

.