गोव्यात शुक्रवारी जोरदार पाऊस
मान्सूनोत्तर चक्क 15 इंच बरसला
पणजी : गोव्यात शुक्रवारी देखील सर्वत्र जोरदार पाऊस बरसला. 2019 नंतरचा हा सर्वाधिक पाऊस ठरला. मान्सूनोत्तर पाऊस चक्क 15 इंच झाला. अजूनही पावसाचा अंदाज वर्तविला जात असून नोव्हेंबरच्या 15 तारीखपर्यंत गोव्यात पावसाचे प्रमाण कमी अधिक राहील. गेल्या 24 तासात गोव्यात सरासरी 11.6 म्हणजे एक सेंटीमीटर एवढा पाऊस पडला. हवामान खात्याने मान्सूनोत्तर पाऊस हा 375 सेंटीमीटर एवढा वर्तविला आहे. प्रत्यक्षात साखळी आणि वाळपई या केंद्रामध्ये मुसळधार पाऊस पडूनदेखील बऱ्याच दिवसात त्याची नोंद झालेली नव्हती ती नोंद झाली तर पावसाचे प्रमाण आणखी वाढलेले असणार. हवामान खात्याने गेल्या पाच वर्षांचा रेकॉर्ड दिलेला असून त्यामध्ये दरवर्षी मानसूनोत्तर पावसाचे प्रमाण दिलेले आहे.
त्या तुलनेत यंदा जास्त पाऊस झाल्याचे दिसून येते. पावसाचे व्यवस्थितपणे मोजणे शक्य झाले तर गोव्यात खरा पाऊस नेमका किती पडला हे कळू शकेल. ऑक्टोबरमध्ये साधारणत: पाच ते सहा इंच एवढाच पाऊस होतो. यंदा तो 15 इंच झाला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशीच पाऊण इंच पाऊस पडला 11 ऑक्टोबर रोजी एक सेंटीमीटर, तर 21 ऑक्टोबर रोजी पाऊण इंच पाऊस झाला. ऑक्टोबरमधील सर्वाधिक पाऊस हा 27 ऑक्टोबर रोजी नोंदविला गेला. अनेक भागात मुसळधार पाऊस पडला, परंतु सरासरी त्या दिवशी तीन इंच पावसाची नोंद झाली. 25 रोजी देखील तीन इंच आणि 30 ऑक्टोबर रोजी सरासरी अडीच इंच पाऊस गोव्यात नोंदविला गेला. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाण हे तसे कमी असते यंदा तो थोडा जास्त झाला.