Crop Damage: अतिवृष्टीमुळे 8835 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, सर्वाधिक फटका ऊस पिकाला
या मदतीचा प्रस्ताव जिल्हा कृषी कार्यालयाकडून राज्य शासनाकडे पाठवला आहे
कोल्हापूर : ऑगस्टमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे जिह्यातील 36 हजार 559 शेतकऱ्यांच्या 8835.15 हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये शिरोळ तालुक्यातील 3120 हेक्टरवरील पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. कृषी विभागाने तालुकानिहाय तयार केलेल्या अहवालात जवळपास 14 कोटी 28 लाख 52 हजार 344 रुपयांच्या मदतीची अपेक्षा शासनाकडून आहे.
या मदतीचा प्रस्ताव जिल्हा कृषी कार्यालयाकडून राज्य शासनाकडे पाठवला आहे. जुलै महिन्यातच पावसाला जोरदार सुरुवात झाली होती. आणि त्या काळातही काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाल्यामुळे 60 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाकडून अपेक्षित आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात 24 दिवसांतच 326.8 मिमी पाऊस झाला. अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस झाल्याने पिके पूर्णपणे नष्ट झाली.
या जोरदार पावसाचा परिणाम केवळ पिकांवरच नव्हे, तर नद्यांच्या पाणीपातळीवरही झाला. मुसळधार पावसामुळे शेतीत पुराचे पाणी तब्बल 12 ते 15 दिवस साचून राहिले. पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडले आहेत. कृषी खात्याच्या अहवालानुसार, जिरायत पिकाखालील 1679.03 हेक्टर क्षेत्र पुरामुळे बाधित झाले आहे. या क्षेत्रातील नुकसानीसाठी 1 कोटी 54 लाख 50 हजार रुपये इतका निधी अपेक्षित आहे.
त्याचप्रमाणे, नदीकाठच्या व बागायती शेतीखालील 7155.92 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, त्या भागासाठी 12 कोटी 73 लाख 97 हजार 736 रुपये इतकी मदत लागणार आहे. एकूण मिळून 8835.15 हेक्टर क्षेत्र पुरामुळे बाधित झाले आहे.
या मोठ्या प्रमाणातील नुकसानीसाठी कृषी विभागाने 14 कोटी 28 लाख 52 हजार 344 रुपये इतका मदत राज्य शासनाकडे पाठवविला आहे. या अहवालात केवळ ऑगस्ट महिन्यातील नुकसानीचा तपशील नाही तर सप्टेंबर महिन्यात काही तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांना झालेल्या हानीचाही समावेश आहे.
प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.
या अहवालात केवळ ऑगस्ट महिन्यातील नुकसानीचा तपशील नाही, तर सप्टेंबर महिन्यात काही तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांना झालेल्या हानीचाही समावेश आहे. शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे ऑगस्टमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे जिह्यातील पिकांचे 33 टक्केच्यावर नुकसान झाले आहे. जिह्यातील 8835 हेक्टरवरील पिकांसाठी 14 कोटींचा निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.
- नामदेव परीट, कृषी उपसंचालक, कोल्हापूर