Rain Effect On Crop: जिल्ह्यात 9378 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, भात पिकाला फटका
काही भागात शेतामध्ये पाणी साचून पिकांचे मोठे नूकसान झाले
By : इंद्रजित गडकरी
कोल्हापूर : ऑगस्टच्या सूरुवातीपासूनच जिह्यात जोरदार पाऊस होता. विशेषत: 16 ते 21 या कालावधीत जोर जास्त होता. हवामान विभागाने या काळात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला होता. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे अनेक वेळा उघडले गेले, यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला.
16 ऑगस्ट रोजी राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले. 5784 क्युसेक विसर्ग झाला. नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ दिसून आली. राधानगरी, हातकणंगले, शिरोळ, कागल तालुक्यातील ऊस, भात, सोयाबिन या पिकांचे नूकसान झाले.
काही भागात शेतामध्ये पाणी साचून पिकांचे मोठे नूकसान झाले. कृषी विभागाने तालुकाआधारे प्राथमिक अहवालातून दिला, त्यात ऑगस्टमध्ये सर्व तालुक्यातील मिळून 445 गावांतील 34167 शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला. जिल्ह्यात एकूण ऊस 5967 हेक्टरवरील ऊस पिकांना या अतिवृष्टीचा तडाका बसला. त्या खालोखाल 1778 हेक्टरवरील भात, 663 हेक्टरवरील सोयाबीन, 655 हेक्टरवरील भुईमूग या पिकांचे नुकसान झाल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.
पंचनामे तयार करण्याची कार्यवाही चालू
"ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामूळे नूकसान झालेल्या सर्व तालुक्यात शेतकऱ्यांच्या नूकसानीचे पंचनामे तयार करण्याची कार्यवाही चालू आहे. येत्या आठ दिवसांत अंतिम आकेडवारी निश्चित होईल."
- नामदेव परिट, कृषी उपसंचालक
तालुक्यानुसार बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि गावे
- तालुके बाधित शेतकरी गावे
- राधानगरी 12691 100
- कागल 500 45
- शिरोळ 2971 18
- हातकणंगले 2410 31
- करवीर 1800 50
- गगनबावडा 1600 29
- शाहूवाडी 1427 34
- पन्हाळा 1285 42