Heavy Rain Effect: मान्सूनपूर्व पावसाचा फटका, आंबा बागायतदारांचे गणित कोलमडले
तोंडचा घास हिरावल्याने अनेक आंबा व्यावसायिक हवालदिल
By : मनोज पवार
दापोली : यंदा मे महिन्याच्या मध्यावरच आलेल्या मान्सूनपर्व पावसामुळे रत्नागिरी जिह्यातील आंबा बागायतदारांचा आर्थिक कणा मोडून पडला आहे. अवेळी आलेल्या व अद्याप थांबण्याचे नाव न घेणाऱ्या पावसामुळे उशिरा आंब्याचे उत्पादन घेणारा आंबा बागायतदार पुरता नागावला गेला आहे. 25 मे रोजी दापोलीत 187.5 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
जिह्यात 30 हजार 68 आंबा बागायतदार आहेत. जिह्यात 1 लाख 13 हजार हेक्टरवर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. यातून दरवर्षी 2 लाख 60 हजार 500 मेट्रिक टन आंबा उत्पादन मिळते. हापूस आंबा कोकण आणि विशेषत: रत्नागिरीचा म्हणून प्रसिद्ध आहे. याची चव आणि गुणवत्ता यामुळे हा आंबा जगभरात प्रसिद्ध आहे.
हापूस आंब्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. ज्यामुळे मोठे परकीय चलनही मिळते. हापूस आंबा युरोप आणि आखाती देशांमध्ये पाठवला जातो. जिह्याचा आर्थिक कणा मत्स्य उत्पादनाबरोबर आंबा उत्पन्नावर देखील अवलंबून आहे. अनेक आंबा बागायतदारांचे आर्थिक गणित हे आंब्याच्या शेवटच्या हंगामातील दरांवर अवलंबून असते.
सिंधुदुर्ग जिह्यात देवगड परिसरात आंबा लवकर येतो. यामुळे तेथील आंब्याचा हंगाम लवकर संपतो. मात्र रत्नागिरी व उत्तर रत्नागिरीमध्ये आंबा उशिरा येतो. त्यामुळे या आंब्याला सुरुवातीचा भला मोठा दर मिळाला नाही तरी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थांबा विक्रीसाठी उपलब्ध असतो. उत्तर रत्नागिरीतील आंबा हा 10 मे पासून काढणीयोग्य होतो. त्याचे साधारण मजुरांच्या उपलब्धतेनुसार 5 जूनपर्यंत काढण्याचे काम चालू असते. तोपर्यंत या आंब्याला प्रचंड मागणी असते.
दापोलीत 50 टक्के आंबा अद्याप झाडांवरच
जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पर्यटक दापोलीत येत असतात. दापोली-हर्णै रोडवर विद्यापीठाच्या प्रक्षेत्रासमोर हे आंबा बागायतदार आपापल्या बागेतील आंबे विक्रीसाठी आणत असतात. त्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित या आंब्यांवर अवलंबून असते. मात्र यावर्षी पाऊस 20 मेपासून सुरू झाला आहे.
तो काही थांबण्याचे नाव घेत नाही. दापोली तालुक्यातील 50 टक्के आंबा हा अद्याप झाडांवरच आहे. आता पाऊस पडल्यामुळे या आंब्याची किंमत कवडीमोल झाली आहे. मान्सूनपूर्व आलेल्या या पावसामुळे उशिरा आंबे येणाऱ्या व झाडावरून उशिरा आंबा काढणाऱ्या आंबा बागायतदारांचे यंदा प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या आंबा बागायतदारांना आता शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे.
बागायतदारांनी एकत्र येणे गरजेचे
उत्तर रत्नागिरीत आंबा उशिरा येत असल्याने आपल्या आंब्याला चांगली मागणी आहे. तसेच कॅनिंगलाही आंब्याला मागणी असते. विमा कंपन्यांचे निकष हेदेखील आपल्याला अनुकूल नसतात. हे निकष आंबा लवकर येण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांसाठीच असतात.
दापोलीतील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे प्रचंड महाग रासायनिक खते घेण्यासाठी पैसेच नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील शेती खरी विषमुक्त शेती आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाकडे दाद मागण्यासाठी या सर्व बागायतदारांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत आंजर्लेतील आंबा व्यावसायिक राजेश जैन यांनी व्यक्त केले.