मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
संगमेश्वर, दापोली, खेड :
मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील बावनदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे वांद्री, उक्षी परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे परिसरातील अनेकांचा संपर्क तुटला आहे. संगमेश्वर बसस्थानकाजवळील 3 दुकाने कोसळल्याची दुर्घटना घडली. खेडमध्ये मटण-मच्छीमार्केट पुन्हा पुराच्या विळख्यात अडकले असून खेड-तीनबत्ती नाका येथे पाणीपातळीत वाढ होऊन दापोली-खेड मार्ग बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
संगमेश्वरातील बावनदीचे पाणी शेतीमध्ये व सखल भागात शिरले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पूर स्थितीमुळे जनसंपर्क तुटला आहे. बावनदीच्या पुरामुळे अनेक महत्वाचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे दैनंदिन कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रशासन सध्या पूर स्थितीवर लक्ष ठेवून आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही नागरिकांनी सतर्क रहावे आणि पूरग्रस्त भागातून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या पूरस्थितीमुळे परिसरातील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

- दुकानदारांचे 4 लाखाचे नुकसान
मुसळधार पावसामुळे संगमेश्वर-देवऊख मार्गावरील बसस्थानकाजवळील 3 दुकाने कोसळल्याची दुर्घटना घडली. या घटनेत दुकानदारांचे सुमारे 4 लाख ऊपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संगमेश्वर बसस्थानकाच्या नदीकाठच्या भागात असलेली ही दुकाने मुसळधार पावसामुळे जमिनीचा काही भाग खचल्याने अचानक कोसळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या दुर्घटनेत बाबासाहेब प्रभावळे यांच्या ऑटोमोबाईल स्पेअरपार्टस दुकानाचे अंदाजे 1 लाख 15 हजार ऊपयांचे नुकसान झाले. अजय निवळकर यांच्या टीव्ही रिपेअरिंग दुकानाचे 2 लाख ऊपयांचे नुकसान झाले असून दिलीप हरी जोशी यांच्या फोटो स्टुडिओचे 1 लाख ऊपयांचे नुकसान झाले. दरम्यान या भागातील इतर दुकानेही धोकादायक अवस्थेत असल्याची शक्यता वर्तवली जात असून स्थानिक प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच तलाठी संदीप घाग आणि कोतवाल अमर जाधव यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

खेड-दापोली मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गे वळवली
सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर दिवसभर कायम राहिल्याने खेडमधील मटण-मच्छीमार्केट पुन्हा पुराच्या विळख्यात अडकले. नगर परिषद प्रशासनाने तीन बोटींसह बचाव पथके तैनात केली आहेत. नारंगीचे पाणी खेड-दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरनजीक घुसताच बॅरिगेटस् लावून मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दरम्यान, पावसाने सायंकाळच्या सुमारास उसंत घेतल्यामुळे पुराचा मोठा धोका टळला.
सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडताच नगर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. नदीकाठच्या रहिवाशांना स्थलांतराच्या सूचना करत व्यापाऱ्यांनाही दुकानातील साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्याचे निर्देश दिले. नगर प्रशासनाने आपत्ती काळात नागरिकांच्या बचावासाठी निवाचा तळ, खांबतळे येथे तातडीने बोटी तैनात करत जीवरक्षकांना पाचारण केले. पूरप्रवण क्षेत्रालगत बोटी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. खेड-दापोली मार्गावर नारंगीचे पाणी घुसताच मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या मार्गावरील वाहतूक शिवतररोड-कुंभारवाडामार्गे वळवण्यात आली. अरुंद रस्त्यामुळे मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला. नारंगी नदी जलमय होवून नजीकची भातशेती पाण्याखाली गेली. तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी पूरसदृश स्थितीची घटनास्थळी जाऊन पाहणी केली.