तेलंगणा-आंध्रात अतिवृष्टीमुळे हानी
► वृत्तसंस्था/ हैद्राबाद, विजयवाडा
तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे वृत्त आहे. गेला आठवडाभर या राज्यांना पावसाने झोडपले असून आणखी चार दिवस पाऊस कोसळत राहील, असे अनुमान पर्जन्यविभागाने वर्तविले आहे. दोन्ही राज्यांनी वृष्टीपिडितांच्या साहाय्यासाठी आपत्कालीन यंत्रण सज्ज केली आहे.
अतिवृष्टीमुळे आंध्र प्रदेशात गेल्या चार दिवसांमध्ये 17 जणांचा, तर तेलंगणामध्ये 16 जणांचा बळी गेला आहे. याशिवाय पायाभूत सुविधा, घरे आणि शेती यांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे प्रशासनांनी स्पष्ट केले आहे. तेलंगणातील अनेक जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.
अनेक जिल्हे प्रभावित
तेलंगणातील कोमारम भीम असिफाबाद, मंचेरिअल आणि जयशंकर भूपालपल्ली या जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. जोरदार वृष्टी, वादळी वारे आणि वीज या संकटांना झेलण्यासाठी सज्ज रहावे, अशी सूचना या जिल्ह्यांमधील नागरीकांना देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री रेवंथ रे•ाr यांनी केंद्र सरकारकडे 2 हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मागितले असून अतिवृष्टीमुळे प्राण गमावलेल्या प्रत्येक नागरीकामागे 5 लाख रुपयांची भरपाई घोषित केली आहे.
आंध्रात हजारोंचे स्थलांतर
आंध्र प्रदेशाच्या गुंटूर, एनटीआर आणि पलांडू जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा विशेष प्रभाव जाणवत आहे. या जिल्ह्यांमधील 6.44 लाख लोक अतिवृष्टीमुळे प्रभावित झाले असून 42,000 लोकांना साहाय्यता शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे. 193 साहाय्यता शिबीरे स्थापित करण्यात आली असून तेथे लोकांना अन्न, पाणी आणि औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. आणखी आठवडाभर अशी स्थिती राहील असे अनुमान पर्जन्यमान विभागाने व्यक्त केलेले आहे.
केंद्रीय दले नियुक्त
पूर आणि अतिवृष्टीमुळे प्रभावित लोकांच्या साहाय्यासाठी केंद्रीय आपत्कालीन साहाय्यता दलांच्या 26 तुकड्या आंध्र प्रदेशात नियुक्त करण्यात आल्या आहेत. तर राज्य सरकारने आपल्या 22 तुकड्यांना कार्यरत केले आहे. भारतीय वायुदलाची हेलिकॉप्टर्सही साहाय्यता कार्यात सहभागी झाली असून पुरामुळे संपर्क तुटलेल्या गावांमधील नागरीकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी त्यांचा उपयोग करण्यात येत आहे. भारतीय नौदलाच्या दोन तुकड्यांची तटवर्ती भागात कार्यरत आहेत.
विजयवाडात विशेष हानी
आंध्र प्रदेशातील सर्वात मोठे शहर विजयवाडाचा संपर्क गेले चार दिवस तुटलेला आहे. शहरातील वीजपुरवठाही बहुतेक भागांमध्ये बंद झाला असून अनेक इमारतींमध्ये पाणी शिरल्याने नागरीकांची कुचंबणा होत आहे. शहराच्या प्रकाशम भागात पाणी ओसरु लागले असले तरी इतर सखल भागांमध्ये ते साचून राहिले आहे. शहरातील अनेक वसतीस्थाने पाण्यात बुडालेल्या अवस्थेत असून त्यांच्यातील अनेक नागरीकांनी सुरक्षित स्थानी आसरा शोधण्याची धडपड चालविली आहे. शहरातील 2.70 लाख लोक अतिवृष्टीमुळे प्रभावित झाले असून एनटीआर जिल्ह्यात 77 साहाय्यता शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत.
काही ठिकाणी सरासरीच्या दुप्पट
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अनेक विभागांमध्ये यंदा आतापर्यंत सरासरीच्या दीडपट ते दुप्पट पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस होत राहील अशी चिन्हे असून प्रशासनाने त्या दृष्टीने सज्जता ठेवली असल्याची माहिती चार जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. दोन्ही राज्यांमध्ये किमान 6 हजार हेक्टरवरील पिके या अतिवृष्टीमुळे नष्ट झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना हानी भरपाई देण्यासाठी पिक परिस्थितीची पाहणी केली जात असून भरपाईचे प्रमाण ठरविले जात आहे.