गुजरात, हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार सुरूच
पूरस्थितीमुळे जीवितहानी, भूस्खलन घटनांचीही नोंद : राजस्थानमध्ये तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
हवामान खात्याने मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशसह 22 राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. राजस्थानमध्ये तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून काही राज्यांमध्ये पावसाचा दणका सुरू आहे. दक्षिणेतील आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांबरोबरच पश्चिम व उत्तरेकडील गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येही पावसाचा हाहाकार सुरू आहे. तसेच राजस्थानमधील जोधपूरमध्ये सर्वाधिक 90.6 मिमी पावसाची नोंद झाली. दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे 2 राष्ट्रीय महामार्गांसह 119 रस्ते बंद आहेत.
हरियाणातील पंचकुला येथे वीटभट्टीची भिंत कोसळून तीन मुलांचा मृत्यू झाला. मध्यप्रदेशातही पावसामुळे एका महिलेचा आणि तऊणाचा मृत्यू झाला. गुजरातमध्ये या पावसाळ्यात आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अन्य राज्यांमध्येही पावसाचा जोर सुरू असून नैसर्गिक आपत्तींमुळे हानीचे सत्र सुरू आहे. नागालँडच्या चुमाउकेडिमा जिल्ह्यातील फेरिमा आणि पगला पर्वतावर मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. यामध्ये एका महिलेसह सहा जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग वाहून गेल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
हिमाचलमध्ये 119 रस्ते बंद
हिमाचल प्रदेशातील सततच्या पावसामुळे बुधवारी दोन राष्ट्रीय महामार्गांसह 119 रस्ते बंद राहिले. गुरुवारीही हवामान खात्याने विविध जिह्यांमध्ये पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट जारी केला होता. राज्यात पावसामुळे आतापर्यंत 153 जणांचा मृत्यू झाला आहे. पुढील तीन दिवस पावसाचे सत्र सुरू राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.