For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा

12:27 PM Mar 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा
Advertisement

डिचोली, सत्तरी, फोंडा, धारबांदोडा तालुक्यांना जोरदार फटका

Advertisement

पणजी : पणजी वगळता राज्यातील बहुतेक भागात मंगळवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपून काढले. डिचोली, सत्तरी, फोंडा, धारबांदोडा तालुक्यांना जोरदार फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात वीजतारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. हवामान खात्याने दुपारीच पावसाचा इशारा दिला होता आणि त्याचबरोबर यलो अलर्टही जारी केला होता. दुपारी उशिरा मोले भागात पावसाला प्रारंभ झाला व त्यानंतर हळुहळू वाळपई व सत्तरीच्या इतर भागाला देखील जोरदार पावसाने झोडपून काढले. सकाळपासून असह्या उकाडा सुरू होता. त्यानंतर दुपारपासून काळे ढग आकाशात जमायला सुरूवात झाली आणि त्यानंतर जोरदार वारे सुरू झाले, नंतर जोरदार पाऊस पडला. फोंडा तालुका तसेच उसगाव मोले, वाळपई, होंडा, सांखळी, डिचोली, म्हापसा येथेही सायंकाळी जोरदार पाऊस पडला.

सोनसड्यावरील कचऱ्यामधून लिचेट (सांडपाणी) मंगळवारी रात्री अवकाळी पडलेल्या पावसात मुख्य रस्त्यावर वाहून आल्याने कित्येक दुचाकीचालक घसरून पडण्याच्या घटना घडल्या. या अपघातांत बहुतांश लोक किरकोळ जखमांवर बचावले. डिचोली तालुक्यात अवकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसाने अनेकांची दाणादाण उडवली. सायंकाळपासून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले. कोणतीही पूर्वतयारी न करता बाहेर पडलेल्या लोकांची बरीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे दुचाकी चालक व इतर प्रवाशांचे हाल झाले. तालुक्यातील काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडेही पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

Advertisement

फोंडा तालुक्यासह शेजारील धारबांदोडा तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. उसगाव भागाला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला असून बऱ्याच ठिकाणी झाडांची पडझड झाली. मोले व आसपासच्या भागातील लोकांनी गारपिठासह पाऊस अनुभवला. सायंकाळी लोकांच्या कामावरुन घरी परतण्याच्या वेळी अचानकपणे पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. पणजीत सायंकाळी उशिरा पावसाचा शिडकावा झाला. मात्र दुपारच्या जोरदार पावसाने सत्तरी व फोंडा तालुक्यात नुकसान झाले, मात्र हवेत गारवा आला. कित्येक भागात एवढा जोरदार पाऊस पडला की रस्त्याच्या बाजूने असलेली गटारे पाण्याने तुडूंब भरली. या पावसाचा विपरित परिणाम आंबा बागायतींवर होणार आहे.  आंब्याला काळ्या रंगाचे डाग बाहेरून निर्माण होण्याची शक्यता आहे. काजूला देखील हा पाऊस त्रासदायक ठरू शकतो.

चोडण बेटाला चक्रीवादळाचा फटका

तिसवाडी तालुक्याला विशेष फटका बसला नसला तरी तालुक्यातील चोडण बेटाला मात्र चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. सायंकाळी वादळी वारे जोरात वाहल्याने बेटावरील प्रमुख रस्त्याव्ंार अनेक झाडे पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर असलेली चारचाकी व अन्य मोठी वाहने जागच्या जागीच अडकून पडली आहेत. दुचाकीचालकांनी वाट मिळेल तिथून जाऊन आपली घरे गाठली. चोडण फेरीबोटपासून सुरू झालेल्या मुख्य मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद पडली आहे. पणजी व गोव्याच्या अन्य भागातून चोडण बेटावर येणारी अनेक वाहने रायबंदरच्या बाजूनेच ठेवावी लागली आहेत. अनेक ठिकाणी घरांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. काही नव्यानेच उभारण्यात आलेल्या घरांचेही नुकसान झाले. वीज तारा तुटून पडल्याने रात्री उशिरापर्यंत वीज खंडितच होती. नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईलसह अन्य ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले आहेत. अग्निशामक दलाला पाचारण करणेही शक्य होत नाही आणि रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने, वाहने अडकून पडल्याने दलाची वाहनेही बेटावर पोहोचू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement
Tags :

.