For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माफीच्या मागणीवरून जोरदार खडाजंगी

03:12 PM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
माफीच्या मागणीवरून जोरदार खडाजंगी
Advertisement

आमदार अॅल्टन डिकॉस्टा यांनी सभापतींचा अपमान केल्याचा दावा : तब्बल दोन वेळा कामकाज तहकूब : प्रश्नोत्तराला बगल दिल्याचा विरोधकांचा आरोप

Advertisement

प्रतिनिधी / पणजी

प्रश्नोत्तराला बगल देण्यासाठीच सरकारकडून गदारोळाचे नियोजनबद्द नाट्या रचण्यात आले होते, असा आरोप विरोधी आमदारांनी केला. विरोधी आमदार अॅल्टन डिकॉस्टा यांनी सभापतींची माफी मागावी, अशी मागणी करणारे ‘फलक’ सर्व सत्ताधारी आमदार आधीच घेऊन आले होते, हा त्याचा पुरावा आहे, असा दावा विरोधकांनी केला आहे.

Advertisement

बाहेर धो-धो पाऊस कोसळत असताना विधानसभेत मात्र प्रचंड वादळी चर्चेसह शब्दांचा गडगडाट सुरू होता. हा गडगडाट असह्य होऊन सभापतींनी चक्क दोन वेळा प्रत्येकी अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब केले आणि त्या गदारोळातच प्रश्नोत्तर तास संपुष्टात आला. त्यानंतर मध्यांतरापर्यंतचे पुढील कामकाज सुरळीत पार पडले.

साळकर यांचा हक्कभंग ठराव

आमदार अॅल्टन डिकॉस्टा यांनी अनुसूचित जमातीला (एसटी) राजकीय आरक्षणावरून विधानसभेत चर्चेचा खासगी प्रस्ताव मांडला होता. मात्र सभापतींनी तो फेटाळला होता. त्याबाबत सभागृहाबाहेर बोलताना डिकॉस्टा यांनी सभापती आणि भाजप सरकार एसटींविरोधात असल्याची टीका केली होती. त्यासंबंधी भाजपचे आमदार दाजी साळकर यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला व डिकॉस्टा यांनी सभापतींची माफी मागावी, अशी मागणी केली. परंतु, डिकॉस्टा यांनी माफी मागण्यास नकार दिला.

तयार करून आणले होते फलक

यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंतही आक्रमक झाले. सभापतींचा अपमान सहन करून घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हस्तक्षेप करताना, असा प्रस्ताव दाखल करून आमदार डिकॉस्टा यांनी कोणतीही चूक केलेली नाही. त्यामुळे ते अजिबात माफी मागणार नाहीत, असे स्पष्ट केले. तरीही गरज असेल तर सदर प्रकरण हक्कभंग समितीकडे द्यावे, असे आलेमाव म्हणाले.

हा प्रकार सुरू असताना भाजपच्या अनेक आमदारांनी आधीच तयार करून आणलेले फलक झळकावत डिकॉस्टा यांच्याकडे माफीची मागणी केली. मात्र अखेरपर्यंत डिकॉस्टा यांनी माफी मागितली नाही.

.................बॉक्स...........................

आमदाराने सभापतीविरोधात

सभागृहाबाहेर  बोलणे अयोग्य

यावेळी बोलताना सभापती तवडकर यांनी, 1996 पासून आपण एसटी समाजाच्या न्याय हक्कांसाठी काम करत असल्याचे सांगितले. या प्रश्नावर आम्ही यापूर्वीच दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. एसटी आरक्षणासाठी आम्ही सर्वप्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. तरीही एखाद्या आमदाराने आपल्याविरोधात सभागृहाबाहेर बोलणे अयोग्य आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.