अयोध्यानगरीत जोरदार सुसज्जता; अयोध्येला त्रेतायुगासारखा 'लुक'
मुख्य रस्त्याच्या दुतर्फा सूर्यस्तंभ करणार स्वागत इमारती, दुकानांचे सौंदर्यही मन मोहून टाकणारे
► वृत्तसंस्था/ अयोध्या
भगवान श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. अयोध्येला त्रेतायुगासारखे दिसावे यासाठी उत्तर प्रदेश सरकार आणि भारत सरकारकडून सुशोभीकरण करण्यात आले आहे. रात्री लखलखणारे दिवे, अयोध्येतील दुकानांवर सजवलेले लाडू, भगवान श्रीराम आणि हनुमानाचे ध्वज अयोध्येत सर्वत्र फडकत आहेत. रात्रीच्या प्रकाशात त्याची चमक अधिकच उजळणार आहे. लखलखत्या दिव्यांनी मंदिराचे रूप घेतलेल्या अयोध्येतील इमारती आणि दुकानांचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालेल.
22 जानेवारी 2024 चा दिवस भारताच्या इतिहासातील एक महान सण म्हणून साजरा केला जाईल. या रामजन्मभूमी मंदिरात भगवान श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यामुळे अयोध्येतील सौंदर्य व तेज उजळून निघालेले दिसत आहे. धार्मिक मार्गावर येणाऱ्या भाविकांचे आणि पर्यटकांचे स्वागत सूर्यदेव स्वत: करताना दिसतात. रस्त्याच्या दुतर्फा ‘सूर्यस्तंभ’ साकारण्यात आले असून ते सूर्यासारखे झळकत आहेत. मुख्य मार्गावरून पुढे जात असताना लता मंगेशकर चौराहा वीणाचे सूर भाविकांचे मन प्रसन्न करतील.
सर्वत्र सजावट करण्याबरोबरच ठिकठिकाणी एलसीडी स्क्रीनही लावण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी एलसीडीच्या माध्यमातून रामभक्त मठ आणि मंदिरांची आरती अनुभवता येईल. याशिवाय हजारो पर्यटक आणि भाविक अयोध्येतील राम की पौरी येथे प्रभू रामाच्या लीलांचा लेझर शो अनुभवणार आहेत.