परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान
धामणे, सुळगे (ये.), राजहंसगड, नंदिहळ्ळी भागातील शेतकरी हवालदिल : पेरणीची कामे थांबल्याने चिंता
वार्ताहर/धामणे
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या वळीव पावसामुळे हातातोंडाला आलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे धामणे, सुळगे (ये.), देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या भागातील भात पेरणी संपताच पावसाने जोर केल्याने भातपिकाचे लहान रोपे पाण्याखाली जाऊन अनेक शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. भात पिकाचे रोप बाद झाल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यानी नव्याने भात पिकाच्या रोपांची लागवड केली होती आणि हे भातपीक चांगले यावे यासाठी दुबार रासायनिक खते वापरुन हे भातपीक थोड्या प्रमाणात मिळविण्यासाठी बरेच परिश्रम घेण्यात आले. आता भातपीक हातातेंडाला म्हणजे भात पिकाच्या कापणीला दिवाळीचा सण संपवून सुरुवात करण्यात येणार होते.
जोंधळा वाहून गेल्यामुळे नुकसान
गेल्या पाच सहा दिवसांपासून परतीच्या वळीव पावसाला सुरुवात झाली. धामणे, सुळगे (ये.), देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्याचप्रमाणे गेल्या पंधरा ते वीस दिवस पाऊस गेल्यामुळे काटे शिवारातील रताळी, बटाटा, भुईमूग, सोयाबिन ही पिके काढण्यात आली. परंतु ही पिके काढून आता या शिवारात जोंधळा पेरणीचे काम जोमात सुरू असतानाच पाऊस सुरू झाला. परूंत या पावसात काही शेतकऱ्यांची पेरणी केलेला जोंधळा धान्य वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अजून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची पेरणीची कामे थांबली असल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.