Kolhapur : वारणानगरात दुचाकीची जोरदार धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
पन्हाळा तालुक्यात दुचाकी अपघातात ६५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
वारणानगर : वाघबीळ - मसुदमाले ता. पन्हाळा रोडवर माले येथे डेअरीत दूध घालण्यासाठी चालत जात असताना दुचाकीने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत शेतकरी जागीच ठार झाला. भीमराव रघुनाथ चौगुले वय ६५ रा.मसुद माले ता. पन्हाळा असे त्याचे नाव आहे. गुरुवार दि.२७ रोजी घडलेल्याअपघात प्रकरणी दुचाकीस्वार गौतम दगडू हिरवे रा.माले यांच्यावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत कोडोली पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, भीमराव चौगुले हे सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान माले गावातील दूध डेअरीमध्ये दूध घालण्यासाठी चालत जात होते. बाघबीळकडून माले गावी मोटरसायकल वरून भरधाव वेगाने चाललेल्या गौतम हिरवे यांची चौगुले यांना पाठीमागून जोरात धडक बसल्याने ते रस्त्यावरून वीस फूट फरफडत गेले. त्यांच्या दोन्ही पायास डोक्यास व छातीस जबर मार लागला.
त्यांना उपचारासाठी तातडीने कोडोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी गौतम हिरवे यांच्या वरती कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चौगुले यांच्या पश्चात पत्नी, दोन मले एक मलगी सना व नातवंडे असा परिवार आहे