उष्णतेच्या झळा
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशासह देशभर उष्णतेची लाट निर्माण झाली असून, पुढच्या काही दिवसांत उष्णतामान आणखी वाढण्याची चिन्हे दिसतात. साधारण फेब्रुवारी ते मे हा उन्हाळ्याचा कालावधी मानला जातो. तथापि, यंदा मार्चपासूनच कडक उन्हाळा जाणवू लागल्याचे पहायला मिळाले. एप्रिलपासून हा पारा आणखीच वाढला असून, देशातील अनेक मुख्य शहरांमधील तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसदरम्यान पोहोचल्याचे दिसून येते. खरे तर भाजून काढणारे उन, उष्णतेच्या प्रचंड झळा आणि त्यात होणारी अंगाची लाही लाही यातूनच यंदाच्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात येते. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास मागच्या आठवडाभरापासून राज्यात उन्हाने कहर केला आहे. जळगाव, अकोला यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सूर्य अक्षरश: आग ओकत असून, येथील तापमान 44 अंशांच्या वर पोहोचल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. विदर्भ आणि उष्णतेच्या लाटा हे उन्हाळ्यातील समीकरणच मानले जाते. किंबहुना यंदा एप्रिलच्या सुऊवातीलाच विदर्भातील तापमानाने 45 अंशाचा आकडा गाठल्याचे दिसते. उपराजधानी नागपूरसह अमरावती, वर्धा, यवतमाळ यांसारख्या जिल्ह्dयांमधील तापमानाचा पारा तब्बल 42 अंशांवर जाणे, यातूनच येथील परिस्थितीची कल्पना यावी. हे बघता पुढच्या महिनाभरात येथील उन्हाळा कोणत्या टोकाला जाणार, याची विदर्भातील जनतेमध्ये धास्ती आहे. एकेकाळी पुण्यामुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्र हा विदर्भ व मराठवाड्याच्या तुलनेत सुसह्या मानला जायचा. कोकण पट्ट्यात घामटा जरूर निघायचा. पण, भाजून व अंग पिळवटून काढणारे वातावरण या भागात कधीच अनुभवायला मिळत नसे. तापमानाचा पाराही 35 ते 38 च्या आसपास सीमित असायचा. मागच्या काही वर्षांत मात्र येथील वातावरणात प्रचंड बदल झाले आहेत. एरवी दमट वातावरणामधील या भागातील तापमानही आता 40 ते 42 च्या वर पोहोचावे, यातच सर्व आले. ठाणे जिल्हा हाही कोकण किनारपट्टीचा भाग. तेथील कमाल तापमानही सध्या 42 ते 43 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हे म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु, मागच्या काही वर्षांतील तेथील स्थिती बघितली, तर उन्हाळ्यात या जिल्ह्यांमध्ये पाय ठेऊ नये, असे वाटावे. मागच्या आठवड्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागांतील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला, हे खरे. पण, हे सारे ताप्तुरतेच. आता पुढचा महिना, दीड महिना नागरिकांची सर्वार्थाने कसोटी लागणार, हे विसरू नये. उष्णतामान वाढले, की उष्माघाताचा त्रास होण्याचा धोका असतो. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 30 जणांना हा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. यात बुलढाणा, गडचिरोली, परभणी या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी चार ऊग्ण असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय रायगड, सांगलीतही प्रत्येकी एक ऊग्ण सापडला आहे. देशातही यापेक्षा वेगळे चित्र दिसत नाही. हे बघता उष्णतेच्या लाटेपासून काळजी घेणे आवश्यक ठरते. वाढत्या तापमानामुळे शरीरात झपाट्याने निर्जलीकरण होते. त्यातून चक्कर येणे व रक्तदाब कमी होण्यासारखे त्रास उद्भवू शकतात. हे ध्यानात घेऊन दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळायला हवे. मुख्य म्हणजे शरीरातील तापमान टिकविण्यासाठी पुरेसे पाणी प्यायला हवे. लिंबू वा कोकम सरबत, माठातील पाणी, नारळपाणी, ताक, ओआरएस यांसह द्रवयुक्त आहारावर उन्हाळ्यात भर दिला पाहिजे. मुळात जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. गुजरातमधील अहमदाबाद, गांधीनगर, राजकोट, भूज, सुंदरनगर, राजस्थानमधील बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, मध्य प्रदेशातील खजुराहो, रतलाम, ही शहरेही सध्या भाजून काढत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेशपासून खाली कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत सर्वत्रच कमी अधिक प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यामुळे हा उन्हाळा सुसह्या करण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावे लागतील. उन्हाळा आला, की त्याच्यासाबेत पाण्याचे प्रश्नही उसळी घेतात. सध्या देशातील गावखेड्यापासून अगदी महानगरापर्यंत सर्वत्र पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांना दरवर्षीप्रमाणे यंदाही वणवण करावी लागत आहे. शहरांमध्येही हीच परिस्थिती दिसून येते. नळ आहे, पण पाणी नाही, असेच चित्र बहुतांश ठिकाणी दिसते. अनेक शहरांमध्ये दोन ते पाच दिवसांनी पाणी येत असून, तेही पुरेसे नसल्याचे सांगितले जाते. सोलापूरसह राज्याच्या व देशाच्या अनेक भागांत गढूळ वा अशुद्ध पाणी नळाला येत असल्याचे दृश्य पहावयास मिळते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती संभवते. हे बघता प्रशासनाला योग्य ती पावले उचलावी लागतील. अनेक भागांत टँकर सुरू झाले असले, तरी ही संख्या अपुरी आहे. हे पाहता नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यास प्राधान्य दिले पाहिजे. पावसाळ्याला आणखी दोन ते अडीच महिने आहेत. त्यामुळे पुढचा टप्पा अतिशय खडतर असू शकतो. पाण्याची वाढती गरज व बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षात घेता जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ शकतो. हे लक्षात घेऊन पुढचे नियोजन करावे लागेल. नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने उपयोग करीत पाणीबचतीचा मंत्र जपायला हवा. त्याचबरोबर गाड्या धुणे, रस्त्यावर पाणी मारणे यांसारख्या गोष्टींना फाटा द्यावा. पाणी गळतीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्यामुळे प्रशासनानेही दुऊस्तीच्या कामांकडे काटेकोर लक्ष दिले पाहिजे. पुढच्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, कच्छ, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, झारखंड यांसारख्या राज्यात उष्णतेच्या लाटा येण्याची चिन्हे आहेत. उष्णतेचा हा प्रकोप कमी अधिक प्रमाणात असाच राहू शकतो. हे बघता उष्णतेच्या झळांपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील. प्रत्येक ऋतुमानात काय काळजी घ्यावी, याची एक आहार-विहारसंहिता आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्षाच्या अभ्यासातून निश्चित केली आहे. तिचेही प्रत्येकाने कसोशीने पालन करावे.