उत्तर भारतात उष्माघाताने हाहाकार
बिहारमध्ये 24 तासात 59 जणांचा मृत्यू : सात राज्यात 80 हून अधिक बळी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, पाटणा
उत्तर भारतात सध्या उष्मालाट पसरली असून सात राज्यांमध्ये तब्बल 80 हून अधिक बळींची नोंद झाली आहे. बिहारमध्ये प्रचंड उष्णतेमुळे मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या 24 तासात बिहारमधील विविध जिह्यांमध्ये 59 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू उष्माघाताने झाल्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, सर्वसामान्य जनता आणि मतदान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेशात मिर्झापूरमध्ये भीषण उष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे निवडणूक सेवेवर असलेल्या 5 होमगार्डचा मृत्यू झाला. तसेच 16 होमगार्डची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. सातव्या टप्प्यातील मतदानासाठी हे सर्व होमगार्ड कर्तव्यावर तैनात होते. उष्म्यामुळे आजारी पडलेल्या कर्मचाऱ्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पाच होमगार्डचा मृत्यू झाला.
उत्तर भारतातील उष्णतेने सर्व विक्रम मोडले आहेत. अनेक ठिकाणी तापमान 51 अंशांच्या पुढे गेले आहे. प्रशासकीय आकडेवारीनुसार, बिहारमध्ये सध्या कडक उन्हाने लोकांची होरपळ सुरू आहे. परिणामत: पाटण्यात 11, औरंगाबादमध्ये 15, रोहतासमध्ये 8, भोजपूरमध्ये 10, कैमूरमध्ये 5, गयामध्ये 4, मुझफ्फरपूरमध्ये 2, बेगुसराय, बारबिघा, जमुई आणि सारणमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. या लोकांचा मृत्यू कसा झाला याची माहिती आपत्ती व्यवस्थापन गोळा करत आहे.
देशाच्या उत्तर भागात उष्णता कमालीची वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये तापमान 50 च्या जवळ पोहोचले आहे. हवामान खात्याने दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, ओडिशा, मध्यप्रदेश इत्यादींसह भारताच्या मोठ्या भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेसह कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, 30 मे नंतर अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होईल, असे हवामान खात्याने म्हटले असले तरी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये उन्हाचा कडाका कायम आहे. प्रचंड उष्णतेमुळे मानवी जीवनासोबतच वन्यप्राण्यांवरही परिणाम होत आहे.