जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष
सांगली :
यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उष्णतेची लाट आली असून अशा काळात उष्माघात होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये येथे उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी दिली.
राज्यासह सांगली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. रविवारचे जिल्हयाचे कमाल तापमान ३९ अंशावर गेले होते. एप्रिल व मेमध्ये कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा ४० अंशावर जाण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये येथे उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. प्रत्येक कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन यासह औषधोपचारासाठी सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उष्माघाताची कारणे : शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीची व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा कारणाने उष्माघात होऊ शकतो. लक्षणे मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, रक्त दाब वाढणे. अशी लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करा.
- असे करावे उपचार
रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत, रुग्णाचे कपडे सैल करुन त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, पंखा एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत. रुग्णाच्या काखेखाली आईस पॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवाव्यात.
- अद्याप उष्माघात रूग्ण नाही
सांगली जिल्ह्यात अद्याप उष्माघाताचा एकही रुग्ण आढळून आला नाही. कोणाला उष्माघाताचा त्रास जाणवू लागला तर नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व रुग्णास रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास १०८ अॅम्बुलन्ससाठी कॉल करावा.
डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी