‘हीटरयुक्त जॅकेट’, बटण दाबताच फुटतो घाम
आमच्या देशात ऋतूंचे विक्राळ स्वरुप काही महिन्यांमध्ये दिसून येते. उन्हाळा येताच एसीशिवाय कित्येकांना राहवत नाही, तर पावसाळय़ात छत्री किंवा रेनकोटशिवाय घराबाहेर पडता येत नाही. हिवाळय़ात घरात असो किंवा बाहेर हीटरची गरज भासते. अशा स्थितीत एक असे जॅकेट तयार करण्यात आले आहे, जे चालता-फिरतानाही हीटरची उब मिळवून देणार आहे.
मार्केटमध्ये आलेल्या हीटिंग जॅकेटमध्ये हीटर बसविण्यात आला असून त्याचे एक बटण दाबताच तुम्हाला कडाक्याच्या थंडीतच मे-जूनसारख्या उष्णतेची अनुभूती मिळणार आहे. हे जॅकेट तसे फारसे महाग देखील नाही. शरीराला उबदार ठेवणारे हे जॅकेट आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.
जॅकेटच्या आत 5 वेगवेगळे हीटिंग झोन असून ते पूर्ण शरीराला उबदार ठेवतात. भरभक्कम कपडय़ांऐवजी या एका जॅकेटद्वारे कडाक्याच्या थंडीतही सहजपणे वावरू शकतात. जॅकेटकरता वापरण्यात आलेले मटेरियला याला वेगळा दर्जा मिळवून देते. जॅकेटमधील बटण दाबताच हीटिंग एलिमेंट ऑन होते, तापमान नियंत्रित करण्यासाठी 3 लेव्हल्स देण्यात आल्या असून त्या बटणद्वारेच सेट करता येतात. हे जॅकेट धुण्यापूर्वी यातील हीटिंग एलिमेंट बाहेर काढणे आवश्यक आहे. हे जॅकेट काही हजार रुपयांमध्ये उपलब्ध झाले आहे. याच्या सोबत युएसबी हीटिंग सपोर्ट मिळते, ज्याद्वारे हे जॅकेट चार्ज करता येते.