युरोपमध्ये उष्णता लाटेचा कहर
फ्रान्स-इटलीमध्ये रेड अलर्ट जारी : स्पेन-पोर्तुगालमध्ये 46 अंशावर तापमान
वृत्तसंस्था/ पॅरिस, माद्रिद
दक्षिण युरोप आणि ब्रिटन सध्या भीषण उष्णतेला सामोरा जात आहे. सोमवारी स्पेन आणि पोर्तुगालमध्ये स्थानिक स्तरावरील उच्चांकी तापमान नोंद झाले. तर इटली आणि फ्रान्समध्ये उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला.
भूमध्य समुद्राच्या क्षेत्रातील देशांमध्ये यंदाची पहिली भीषण उष्मालाट आली आहे. सरकारने लोकांना घरातच थांबण्याचा, मुले आणि वृद्धांच्या सुरक्षेसाठी खास खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला.. अशी स्थिती पूर्वी कधीच पाहिली गेली नव्हती. फ्रान्सच्या 16 क्षेत्रांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पर्यटनस्थळांवर रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून अग्निशमन दलालाही सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती फ्रान्सचे पर्यावरणमंत्री एग्नेस पनिये-रनाचे यांनी दिली.
आग अन् उष्णतेमुळे हतबल
फ्रान्स, तुर्किये अन् इटलीच्या जंगलांमध्ये वणवे भडकले आहेत. इटलीच्या नेपल्सनजीक बाइआ डोमिजियामध्ये लोक वणव्यांमुळे समुद्राच्या दिशेने पोहोचू लागले आहेत. इटलीत पुढील काही दिवसांपर्यंत 18 शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला, यात रोम, मिलान आणि फ्लोरेन्स यासारखी मोठी शहरे सामील आहेत. फ्रान्समध्ये बुधवारी देखील उष्णतेचा तडाखा अधिक राहणार असल्याचा अनुमान आहे. स्पेनच्या दक्षिण हिस्स्यांमध्ये शनिवारी तापमान 46 अंशापर्यंत पोहोचले, जून महिन्यासाठी हा एक उच्चांक आहे. पोर्तुगालच्या मोरा शहरात रविवारी तापमान 46.6 अंश नोंदविले गेले.
समुद्राचे तापमान वाढलेले
भूमध्य समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. हवामानतज्ञांनुसार रविवारी समुद्राचे तापमान 26.01 अंशापर्यंत पोहोचले. फ्रान्समध्ये शालेय सत्र चालू आठवड्यात समाप्त होणार आहे. तर स्पेन, पोर्तुगाल आणि इटलीत सुटी पूर्वीच सुरू झाली आहे क्रोएशिया आणि मोंटेनेग्रोच्या सागरी भागांमध्येही रेड अलर्ट जारी आहे. सर्बियाच्या अनेक हिस्स्यांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली. हवामान बदलामुळे उन्हाळ्यात अशाप्रकारच्या उष्मालाटेचे प्रमाण वाढत आहे. खासकरून शहरांमधील इमारतींच्या गर्दीत उष्णता अधिक वाढते. इटलीच्या फ्लोरेन्स अन् बोलोग्ना शहरांमध्ये पूर्ण आठवडाभर अधिक उष्णतेची स्थिती राहिली.