पवित्र भूमीला वंदन करताना मनापासून आनंद
एकंबे :
अखंड हिंदुस्तानच्या गौरवशाली इतिहासामध्ये कण्हेरखेडच्या पवित्र भूमीला मानाचे स्थान आहे. कण्हेरखेडच्या पवित्र मातीने अखंड हिंदुस्तानचे राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याची ताकद दिली. श्रीमंत महादजी शिंदे हे या पवित्र भूमीतील वीर योद्धा होते. त्यांच्या या पवित्र भूमीला वंदन करताना मनापासून आनंद होत आहे. राजकीय नेता अथवा केंद्रीय मंत्री म्हणून मी या गावात आलो नाही तर या कुटुंबातील प्रमुख म्हणून आलो आहे. जीवनातील शेवटच्या श्वासापर्यंत कण्हेरखेडच्या सर्वांगिण विकासामध्ये योगदान देणार असून शिंदे मंडळींबरोबर कायम राहणार आहे, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय मंत्री श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.
- मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेरच्या शिंदे संस्थानचे अधिपती
मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोमवारी सायंकाळी पाच वाजता त्यांनी महाराणीसाहेब प्रियदर्शनीराजे आणि युवराज आर्यमानराजे यांच्या समवेत शिंदे कुटुंबियांचे मूळ गाव असलेल्या कण्हेरखेड गावास भेट दिली. गावात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपले पिताश्री श्रीमंत माधवराव शिंदे यांच्या पुतळ्यास आणि राजमाता यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. फुलांचा भला मोठा हार घालत त्यांनी वंदन केले. त्यानंतर गावात प्रवेश करत असताना थेट जमिनीवर डोके टेकवत कण्हेरखेडच्या भूमीला अभिवादन केले. त्यांच्या पाठोपाठ युवराज आर्यमान राजे यांनी देखील त्याच पद्धतीने अभिवादन केले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, फलटणच्या श्रीमंत सरदार दिल्ली दिग्विजय वीरमहाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन शिंदे, महाराष्ट्र राज्य योद्धा सरकार प्रतिष्ठानचे बापूसाहेब ढावरे, उद्योजक सतीश खैरे, इतिहास अभ्यासक अमोल जराड, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड. दीपिका शिंदे, लोकनियुक्त सरपंच सारिका शिंदे, उपसरपंच अजित पवार, अॅड. विजयसिंह शिंदे, विकास सोसायटीचे चेअरमन केशव शिंदे, माजी सरपंच संजय शिंदे, दुष्यंतराजे शिंदे फाकडे, माजी चेअरमन संभाजीराजे शिंदे, समीर शिंदे, जयदीप शिंदे, दीपक शिंदे आदी मान्यवर आणि प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी शिंदे राजघराण्याच्या परंपरेनुसार कण्हेरखेड गावातील सर्व मंदिरांना भेट देऊन दर्शन घेतले आणि पूजा केली. त्यानंतर त्यांनी नगर प्रदक्षिणा घातली. राजवाड्याच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ग्रामस्थांसह शिंदे कुटुंबियांशी संवाद साधला. पाच ते सहा वर्षातून मी कण्हेरखेडला येतो. या गावचा मी सुपुत्र आहे. या गावच्या विकासामध्ये मी आजवर योगदान दिले आहे, भविष्यात देखील देणार आहे. गेल्यावेळी 2009 साली जेव्हा आलो होतो, त्यावेळी गावातील पाणी योजनेचा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला होता, तो त्याचवेळी मार्गी लावला आणि गावाला मुबलक पाणी उपलब्ध करून दिले. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत कण्हेरखेडच्या विकासामध्ये योगदान देणार असून शिंदे कुटुंबातील एक घटक या नात्याने सातत्याने यापुढील काळात संपर्क ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते श्रीमंत महादजी शिंदे यांच्यापर्यंतच्या इतिहासाला उजाळा दिला. ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे पौरोहित्य रहिमतपूरचे शेंडे कुटुंबीय गेल्या तीनशे वर्षांपासून करत असल्याचे सांगत त्यांनी सध्याच्या गुरुजींची शिंदे कुटुंबियांना आणि ग्रामस्थांना ओळख करून दिली. त्यांनी सहकुटुंब दुष्यंतराजे शिंदे फाकडे यांच्या निवासस्थानी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासह भोजनाचा आस्वाद घेतला.
- दोन्हीही राजघराण्यांनी जिंकली कण्हेरखेडवासियांची मने
छत्रपती राजघराणे आणि ग्वाल्हेरचे शिंदे राजघराणे यांचे कौटुंबिक नातेसंबंध असून त्याचा प्रत्यय सोमवारी कण्हेरखेडच्या ग्रामस्थांना आला. या दौऱ्यामध्ये मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सहभागी झाले होते. पूर्णवेळ ते श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समवेत होते. दुष्यंतराजे शिंदे फाकडे यांच्या निवासस्थानी भोजनाच्या कार्यक्रमा वेळी दोघांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या. एकूणच दोन्ही महाराजांनी कण्हेरखेडच्या ग्रामस्थांची मने जिंकली. संपूर्ण मराठीतून भाषण करत ज्योतिरादित्य शिंदे यांनी शिंदे कुटुंबाच्या गौरवशाली इतिहासाचा उहापोह केला तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील जोरदार भाषण केले.