Chiplun Earthquake | चिपळूणमध्ये काळजाचा ठोका चुकला! २.१७ मिनिटांनी जमीन हादरली; पाहा कुठे होतं केंद्र
चिपळूणच्या येगाव परिसरात सौम्य भूकंपाचा धक्का
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील येगाव परिसरात बुधवारी दुपारी २.१७ वाजता २.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू येगाव परिसरातच असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असल्यामुळे परिसरातील नागरिकांना फक्त हलका धक्का जाणवला. काही ठिकाणी काही सेकंदांसाठी जमिन हलल्याची भावना निर्माण झाली असली तरी कोणतीही मोठी हादरवणारी परिस्थिती निर्माण झाली नाही.
प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.
भूकंपानंतर परिसरात काही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र अधिकाऱ्यांनी तात्काळ माहिती देत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी शांतता राखावी आणि आवश्यक नसल्यास घाबरून घराबाहेर पडू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.