हृदयाची धडधड अन् अनाकलनीय पडझड
बदलती जीवनशैली, मोबाईलचा अतिवापर, व्यायामाचा अभाव, मधुमेह, अतिरक्तदाब, लठ्ठपणा, मानसिक ताणतणाव, आहारातील बदल आदी हृदयाघातासाठी प्रमुख कारणे असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. संपूर्ण राज्यात वाढत्या हृदयाघातांविषयी चिंता वाढली आहे. इस्पितळात पोहोचण्याआधीच हृदयाघाताने तरुणांचा मृत्यू होतो आहे. एक काळ असा होता की हृदयाघात साठीनंतरच्या व्यक्तींना होतो, असा समज होता.
कर्नाटकातील हासन जिल्ह्यात हृदयाघाताने बळी पडणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. केवळ महिनाभरात विशी ते पंचविशीतील 23 जण हृदयाघाताने दगावले आहेत. केवळ हासनच नव्हे तर इतर जिल्ह्यातही चाळीशीच्या आतील युवकांमध्ये हृदयाघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. बागलकोट येथील 24 वर्षांच्या एमबीबीएस विद्यार्थ्याचा हृदयाघाताने मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे. तरुणाईमध्ये हृदयाघाताचे प्रमाण का वाढले आहे, याची कारणे जाणून घेण्यासाठी जयदेव हृदयरोग विज्ञान व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. के. एस. रवींद्रनाथ यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केवळ हासनच नव्हे संपूर्ण राज्यात या परिस्थितीला कोरोनाच्या काळात घेतलेली लसच कारणीभूत आहे, असा समज बळावत चालला आहे. त्याला वैज्ञानिकरीत्या पुष्टी मिळेल, असा कोणताही संशोधन अहवाल आजवर आला नाही.
स्वत: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही कोरोनाच्या काळात घेतलेली लस ही या परिस्थितीला कारणीभूत असू शकते, असा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर लगेच भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ (आयसीएमआर) व अखिल भारत वैद्यकीय विज्ञान संस्था (एम्स) यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देताना वाढते हृदयाघात व कोविड लस यांचा काही एक संबंध नाही, असे स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून घाईघाईने लस देण्यात आली आहे. त्याचाच परिणाम आता जाणवतो आहे. हा समज केवळ सर्वसामान्य नागरिकांच्या मनातच नव्हे तर राजकीय नेत्यांमध्येही बळावला आहे. काही अपवादात्मक प्रकरणे वगळता कोविडची लस सुरक्षित असल्याचे निरीक्षण आरसीएमआर व राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) ने केलेल्या अभ्यासात नोंदवण्यात आले आहे. हासन जिल्ह्यातील हृदयाघाताची प्रकरणे पाहता इस्पितळाला पोहोचण्याआधीच त्या तरुणांचा मृत्यू झाला आहे.
बदलती जीवनशैली, मोबाईलचा अतिवापर, व्यायामाचा अभाव, मधुमेह, अतिरक्तदाब, लठ्ठपणा, मानसिक ताणतणाव, आहारातील बदल आदी हृदयाघातासाठी प्रमुख कारणे असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. संपूर्ण राज्यात वाढत्या हृदयाघातांविषयी चिंता वाढली आहे. इस्पितळात पोहोचण्याआधीच हृदयाघाताने तरुणांचा मृत्यू होतो आहे. एक काळ असा होता की हृदयाघात साठीनंतरच्या व्यक्तींना होतो, असा समज होता. मधुमेह व हृदयरोग हे श्रीमंतांचे रोग अशी समजूत होती. ही समजूत बदलत्या जीवनशैलीने खोटी ठरवली आहे. शाळकरी मुले हृदयाघाताने दगावत आहेत. मुलांना शिकवता शिकवता चाळीशीच्या शिक्षकाचा हृदयाघाताने शाळेतच मृत्यू होतो आहे. रंगमंचावर कला सादर करता करता तरुण कलाकारांचे हृदयाचे ठोके बंद पडत आहेत. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते पुनित राजकुमार यांचा ऐन तारुण्यात हृदय स्थंबनाने मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण राज्यात हृदयरोग, हृदयाघात आदींविषयी चर्चा सुरू झाली. आता हासन जिल्ह्यातील वाढत्या प्रकारांमुळे संपूर्ण देशभरात या घटनांची चर्चा सुरू झाली आहे.
तरुणाईला वाचवण्यासाठी काय करावे? याचा विचार सुरू झाला आहे. 30 ते 40 च्या आतील युवकांमध्ये हृदयाघाताचे प्रमाण का वाढले आहे, शाळकरी मुलांपासून तरुणांपर्यंत लहान वयात हृदयरोग का जडतो आहे? याचा अभ्यास करून तरुणाईला वाचवण्यासाठी ठोस पावले उचलावी लागणार आहेत. कर्नाटकातील या घटना केवळ कर्नाटकासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी एक धोक्याची घंटा ठरणाऱ्या आहेत. याविषयी व्यापक जनजागृती करण्याबरोबरच लक्षणे दिसून आल्यास वेळेत आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी तरुणाईला प्रवृत्त करण्याची गरज आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनीही हासन जिल्ह्यातील घटनांविषयी चिंता व्यक्त केली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तर राज्य सरकारने हासनमधील हृदयाघाताची प्रकरणे गांभीर्याने घ्यावीत. संपूर्ण राज्यातील तरुणाईच्या आरोग्य रक्षणासाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे. केवळ एका हासन जिल्ह्यातच मृत्यूचे प्रमाण का वाढले आहे, याचा तज्ञांकडून अभ्यास करावा लागणार आहे.
इतर जिल्ह्यातही अशा घटना अधूनमधून घडल्या आहेत. 5 वर्षीय बालकांपासून 40 वर्षांपर्यंतच्या प्रौढांपर्यंत अनेक जण हृदयाघाताने दगावल्याची उदाहरणे आहेत. आरोग्यपूर्ण जीवन कसे जगायचे, जंक फूडपासून दूर राहून सकस अन्नाचे सेवन कसे करायचे? याविषयी आरोग्य खात्याला व्यापक जागृती मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. केवळ अभ्यासासाठी तज्ञ समितीची नियुक्ती करून सरकारची जबाबदारी संपणार नाही. आरोग्य तपासणीचे अभियानही सुरू करावे लागणार आहे. मुळात हृदयरोगावरील उपचार सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. हृदय रुग्णावर उपचार करणाऱ्या सरकारी इस्पितळांची संख्या कमी आहे. खासगी इस्पितळांचे दर गरीब, मध्यमवर्गीय व सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. याचाही विचार करावा लागणार आहे. राज्यातील पंधरा तालुक्यात स्टेमी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हृदयरोगाची लक्षणे आढळून आल्यास पुढील उपचारासाठी त्यांना बेंगळूर येथील जयदेव इस्पितळात पाठविले जाते. कोरोना नंतरच्या काळात हृदयाघाताने दगावलेल्या अनेकांमध्ये हृदयरोगाची लक्षणेच दिसून आली नाहीत. परिस्थिती गंभीर आहे. याची कारणे शोधून तरुणाईला वाचवण्यासाठी उपाययोजना करावी लागणार आहे.
कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस पक्षातील असंतोष चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला परिस्थिती हाताळण्यासाठी बेंगळूरला आले आहेत. असंतुष्ट आमदारांना भेटून त्यांनी त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले आहे. आळंदचे आमदार बी. आर. पाटील यांनी उघडपणे आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्यानंतर इतर आमदारांनीही आपल्याच सरकारविरुद्ध टीका करण्यास सुरुवात केली आहे.
खरेतर नेतृत्वबदलाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार समर्थक आमदारांमध्ये सुरू असलेला संघर्ष हायकमांडसाठी डोकेदुखीचा ठरला आहे. कर्नाटकात नेतृत्वबदलाची चर्चा करण्यासाठी आपण येथे आलो नाही. प्रशासकीय व्यवस्थेबद्दल आमदारांचे अभिप्राय संग्रह करण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी सांगितले आहे. नेतृत्वबदलाचा मुद्दा हायकमांडच्या अखत्यारित येतो, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले आहे. डी. के. शिवकुमार समर्थकांनी अडीच वर्षे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडून द्या, अशी उघडपणे मागणी केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही पुढची पाच वर्षे आपणच मुख्यमंत्री राहणार, असे ठासून सांगितले आहे. नेतृत्वबदलाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष वाढला आहे.