वांगचुक यांच्यासंबंधी 12 जानेवारीला सुनावणी
अटकेला आव्हान देणारी याचिका
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सध्या तुरुंगात असलेले लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या जामीन अर्जावर आता सोमवार, 12 जानेवारी 2026 रोजी सुनावणी होणार आहे. त्यांच्या पत्नी गीतांजली जे. अग्मो यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) पतीच्या अटकेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. गुरुवारी यासंबंधी एका खंडपीठासमोर युक्तिवाद झाला. वांगचुक यांची अटक बेकायदेशीर आणि मनमानी असल्यामुळे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करत युक्तिवाद केला. अटकेनंतर 28 दिवसांपर्यंत अटकेची कारणे ताब्यात घेणाऱ्या अधिक्रायांनी वांगचुक यांना कळवली नसल्याचा दावा त्यांनी न्यायालयात केला. तसेच अधिकाऱ्यांनी अटकेच्या तारखेपासून पाच किंवा जास्तीत जास्त 10 दिवसांच्या आत ताब्यात घेण्याची कारणे देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी आता येत्या सोमवारी पुढील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठ मतप्रदर्शन करू शकते.
सोनम वांगचुक यांना 26 सप्टेंबर 2025 रोजी ताब्यात घेण्यात आले होते. लेहला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीच्या मागणीसाठी झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर त्यांची कारवाई करण्यात आली. वांगचुक यांनी निदर्शकांना चिथावणी दिल्यामुळे हिंसाचार झाला. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आणि 90 जण जखमी झाले, असा प्रशासनाचा आरोप आहे.