काँग्रेसच्या ‘त्या’ आठ आमदारांच्या अपात्रतेविषयी सोमवारी सुनावणी
पणजी : काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 4 मे रोजी सुनावणी निश्चित केली आहे. दिल्लीमध्ये ‘आप’च्या 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, आमदारांच्या किंवा खासदारांच्या एकूण संख्येच्या तीन-चतुर्थांश सदस्यांना मूळ राजकीय पक्षाच्या संमतीशिवाय विलीनीकरणाचा निर्णय घेता येतो की नाही, याविषयी कायदेशीर स्पष्टता मिळण्याच्या दृष्टीने ही याचिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेली ‘विशेष रजा याचिका’ सोमवारी सुनावणीसाठी 54 व्या क्रमांकावर सूचीबद्ध केली आहे. याद्वारे, भाजपात 2022 मध्ये विलीन झालेल्या काँग्रेसच्या आठ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जाणारे आमदार दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, ऊडॉल्फ फर्नांडिस व राजेश फळदेसाई हे आहेत.