म्हादई पाणी वाटपाची 23 पासून सुनावणी
सरन्यायाधीशांसह त्रिसदस्यीय खंडपीठ : सर्व याचिका एकत्रित सुनावणीस घेणार
पणजी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या म्हादई पाणी वाटप प्रकरणाची निर्णायक सुनावणी येत्या गुरुवार दि. 23 जानेवारीपासून सुरू होणार असून सर्व याचिका एकत्र करुन सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात येणार आहे. कर्नाटकच्या विरोधात गोवा सरकारने दाखल केलेली अवमान याचिका देखील त्याचवेळी सुनावणीस घेतली जाण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असून आता तरी त्यावर निवाडा होईल अशी आशा आहे. म्हादई पाणी वाटप प्रकरणात गोवासह महाराष्ट्र, कर्नाटक अशा तीन राज्यांचा समावेश असून त्यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. गोव्याची बाजू न्यायालयात बळकट आहे असे वारंवार गोवा सरकारतर्फे सांगण्यात येते तथापि प्रत्यक्षात मात्र त्याची प्रचीती अजूनपर्यंत तरी आलेली नाही. गोवा विधानसभेत म्हादई प्रश्नावर सभागृह समिती मोठा गाजावाजा करुन स्थापन करण्यात आली पण त्या समितीने अजूनपर्यंत तरी प्रभावशाली कामगिरी केलेली नाही. ‘प्रवाह’ या नावाचे नवीन प्राधिकरण नेमण्यात आले परंतु त्यातूनही काही विशेष साध्य झाले नसल्याचे समोर आले आहे.