For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तरुणीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी

11:16 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
तरुणीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी
Advertisement

पोलीस आयुक्तांनी घेतली गंभीर दखल

Advertisement

बेळगाव : हुबळी-धारवाड या जुळ्या शहरात केवळ महिनाभरात झालेल्या दोन तरुणींच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. ही प्रकरणे हाताळण्यात दुर्लक्षपणा करणाऱ्या पोलीस उपायुक्त, एसीपी, पोलीस निरीक्षक, हवालदार आदींवर निलंबनाची कारवाई झाली आहे. या प्रकरणाने बेळगाव पोलिसांना शहाणपण आले आहे, असे वाटत नाही. एका माथेफिरूने घरावर केलेल्या दगडफेकीसंबंधी तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात गेलेल्या तरुणीला परत पाठविण्यात आले आहे. मंगळवार दि. 21 मे रोजी ही घटना घडली असून बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या या मनमानीविरुद्ध तरुणीच्या कुटुंबीयांनी बुधवारी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. पोलीस आयुक्तांनी कानउघाडणी करताच तरुणीला बोलावून घेऊन तिची फिर्याद दाखल करून घेण्यात आली आहे. किणये, ता. बेळगाव येथील तिप्पाण्णा सुभाष डुकरे (वय 25) या तरुणाविरुद्ध भादंवि 354(डी), 455, 427, 504, 506 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घरावर दगडफेक करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी फिर्याद स्वीकारली नाही म्हणून संबंधित कुटुंबीयांना पोलीस आयुक्तांकडे धाव घ्यावी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण पोलीस स्थानक ठळक चर्चेत आले आहे. मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास तिप्पाण्णा डुकरे याने त्याच गावातील एका घरावर दगडफेक केली आहे. 21 वर्षीय तरुणीवर तो प्रेमासाठी पिडत होता. तिने नकार दिल्यामुळे गेल्या वर्षीही त्याने धमकावले होते. यासंबंधी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआरही दाखल झाला होता. मंगळवारी सायंकाळी घरावर दगडफेकीची घटना घडली आहे.

त्रस्त नागरिकांच्या तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

Advertisement

हुबळी येथील नेहा हिरेमठ या तरुणीची हत्या देशभरात ठळक चर्चेत आली. त्यानंतर अंजली अंबिगेर या तरुणीला पिडणाऱ्या माथेफिरूविषयी तिच्या आजीने पोलिसांना माहिती देऊनही त्याच्यावर कारवाई तर झाली नाहीच, तक्रार करणाऱ्या कुटुंबीयांनाच घरी परत पाठविण्यात आले होते. दुसऱ्याच दिवशी माथेफिरूने खून केला होता. या प्रकरणात पोलिसांचा दुर्लक्षपणा आढळून आल्याने गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या सूचनेनुसार बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. तक्रार घेऊन पोलीस स्थानकात येणाऱ्या त्रस्त नागरिकांच्या तक्रारी वेळेत ऐकून घ्या, अशी ताकीदच अधिकाऱ्यांना करूनही या प्रकरणात मात्र तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात आलेल्यांना उद्या या असे सांगत परत पाठविण्यात आले होते. यावरून बेळगाव ग्रामीण पोलिसांना अशा प्रकरणांचे गांभीर्य किती आहे, हे लक्षात येते.

Advertisement
Tags :

.