मराठी कागदपत्रे मोर्चा खटल्याची सुनावणी पुढे ढकलली
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सन 2017 मध्ये मराठी कागदपत्रांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी ‘रहेंगे तो महाराष्ट्र में’, त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याने दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे. गुरुवारच्या सुनावणीवेळी चार्जफ्रेम केली जाणार होती. पण काहीजण गैरहजर राहिल्याने सुनावणी पुढे ढकलली असून 27 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
शासकीय कार्यालयातून देण्यात येणारी परिपत्रके कन्नडबरोबरच मराठी भाषेतूनही देण्यात यावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 2017 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्याने कन्नड व मराठी भाषिकांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत मार्केट पोलीस स्थानकात मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, सरिता पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, आर. आय. पाटील, संजय शिंदे, राजू बिर्जे, गणेश दड्डीकर, मदन बामणे यांच्यासह 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात दोषारोप दाखल केल्याने या खटल्याची सुनावणी सुरू आहे. गुरुवारी दुसरे जेएमएफसी न्यायालयात सुनावणी होती. यावेळी चार्जफ्रेम केला जाणार होता. मात्र काहीजण गैरहजर राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून 27 जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे.