For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | कसबा सांगावमध्ये औद्योगिक कचऱ्याचे ढीग; 'युनिकेम' कंपनीच्या निष्काळजीपणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

12:32 PM Apr 16, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कसबा सांगावमध्ये औद्योगिक कचऱ्याचे ढीग   युनिकेम  कंपनीच्या निष्काळजीपणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Advertisement

                                   सांगावमध्ये रासायनिक कचऱ्याचे डोंगर

Advertisement

कसबा सांगाव -कसबा सांगाव येथील गट क्र. ४३३ मध्ये औद्योगिक वसाहतीतील युनिकेम कंपनीचा औद्योगिक कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या परिसरात काही कुटुंबे वास्तव्यास असून, या कचऱ्यामुळे नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिणामी, येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

या ठिकाणी प्लास्टिकचे रिकामे बॅरेल, केमिकलच्या बाटल्या तसेच रसायनांच्या रिकाम्या पोती व पिशव्या मोठ्या प्रमाणात उघड्यावर टाकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या कचऱ्याचे अक्षरशः मोठे ढीग तयार झाले असून त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे आणि तीव्र दुर्गंधी निर्माण झाले आहे. काही पिशव्यांना हात लावल्यास चिकट पदार्थ लागत असल्याने या कचऱ्यात रासायनिक अवशेष असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

कंपनीकडून कचरा उचलण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली जात असली तरी त्या कचऱ्याची अंतिम विल्हेवाट कशी लावली जाते, याची जबाबदारी कंपनीचीच असते. मात्र प्रत्यक्षात कचरा ठेकेदाराकडे दिल्यानंतर पुढील प्रक्रियेबाबत कंपनी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. परिणामी, काही ठेकेदार हा कचरा उघड्यावर टाकून निघून जातात.

कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला असता, या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार औद्योगिक कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना, मात्र नियमांचे उल्लंघन करून कचरा उघड्यावर टाकला जातो. संबंधित कंपनी तसेच कचरा टाकणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

औद्योगिक वसाहती असलेल्या भागांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सतत लक्ष असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात तक्रार केल्याशिवाय कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. यामुळे काही कंपन्या व त्यांचे ठेकेदार मनमानी पद्धतीने मोकळ्या जागांमध्ये औद्योगिक कचरा टाकत असल्याचे प्रकार घडत असून पर्यावरणावर त्याचे दुष्परिणाम होत आहेत.

Advertisement
Tags :

.