कोनोलीच्या फटका निवडीवर हिलीची टीका
वृत्तसंस्था / सिडनी
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील दुबईत सोमवारी झालेल्या भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज कुपर कोनोलीने निवडलेल्या चुकीच्या फटक्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि यष्टीरक्षक इयान हिलीने संताप व्यक्त केला.
रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध झालेल्या या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने जॅक फ्रेझर मॅकगर्कच्या जागी शेवटच्या क्षणी कुपर कोनोलीला खेळविण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कोनोलीला आपले खातेही उघडता आले नाही. तो 9 चेंडूंना सामोरे गेला. पण शमीच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारण्याचा निर्णय घेतला आणि तो आपले खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. संथ खेळपट्टीवर शमीचे चेंडू अचूक टप्प्यावरुन स्वींग होत असल्याचे दिसत असतानाही कोनोलीची फटक्याची निवड अयोग्य होती, असेही हिलीने म्हटले आहे. त्याच प्रमाणे ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज ट्रेव्हिस हेडच्या फलंदाजीच्या शैलीबद्दल हिलीने नापसंती व्यक्त केली. कोनोलीला केवळ चार सामन्यांचा अनुभव होता. पण कोनोलीला शमीच्या स्वींग होणाऱ्या चेंडूंचा अंदाज शेवटपर्यंत आला नाही. अवघड परिस्थितीमध्ये ज्यावेळी फलंदाज मैदानात फलंदाजी करत असतो त्यावेळी त्याच्या फलंदाजीची सत्वपरीक्षा असते. चेंडूचे अचूक निरीक्षण करण्यापूर्वीच स्वीपचे फटके मारणे धोकादायक ठरत असतात. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या गोलंदाजीचे तंत्र ओळखू शकले नाहीत. त्यामुळेच ते चुकीचे फटके मारत बाद झाले. सलामीच्या कोनोलीला शमीच्या पहिल्याच षटकातील सर्व चेंडूंनी गोंधळून सोडले होते. कर्णधार स्मिथ आणि कॅरे यांनी अर्धशतके नोंदविल्यानंतर मधल्या कालावधीत ऑस्ट्रेलिया सुस्थितीत वाटत होती. पण शेवटच्या 15 षटकामध्ये भारतीय गोलंदांजांवर दडपण आणण्यासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चुकीचे फटके मारले आणि त्यांना हा सामना गमवावा लागला, अशी संतप्त प्रतिक्रिया इयान हिलीने व्यक्त केली.