आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची आता बायोमेट्रिक हजेरी
कोल्हापूर :
आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची ‘फेस रीडिंग बायोमेट्रिक’ हजेरी घेण्याचे आदेश शासनाच्या आरोग्य सेवा संचालकांनी दिले आहेत. या आदेशानुसार जिह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपव्रेंदासह सर्व संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची 1 एप्रिलपासून ‘फेस रीडिंग बायोमेट्रिक’ हजेरी घ्यावी असे निर्देश जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस यांनी आरोग्य विभागास दिले आहेत. याबाबतचे पत्र त्यांनी जि.प.आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र पिवळा वाडा, सर्व पं.स.तील तालुका आरोग्य अधिकारी व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना शनिवारी दिले.
आधार लिंक बायोमेट्रिक प्राणालीची अंमलबजावणी करणे व त्यानुसार वेतन अदा करण्याचा निर्णय शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. नवीन अर्थिक वर्षात म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी अँड्राईड मोबाईलवरून फेसद्वारे (चेहरा) ऑनलाईन हजरे नोंदवण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन करण्याची सुविधा एनआयसी विभागाकडून सुरु केली असून ती आधारबेस आहे. या सुविधेअंतर्गत कार्यालय अथवा आरोग्य संस्थांचा ‘फेन्स’ सेट करून ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरून हजेरी नोंदवता येणार आहे. यासाठी ‘एईबीएएस’ हे अॅप इंस्टॉल करणे आवश्यक आहे. जे अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांच्या हजेरीमध्ये 3 उशीरा नोंदी झाल्यास त्यांची 1 किरकोळ रजा ग्राह्य धरली जाणार आहे. ज्यांची हजेरी पूर्ण दिवस नोंदवली जाणार नाही, त्यांचा सदरचा दिवस विनावेतन केला जाणार आहे असे सीईओंनी पाठविलेल्या पत्रामध्ये नमूद आहे.