आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची जिल्हा इस्पितळाला आकस्मिक भेट
‘पायाभूत सुविधा, सेवा सुधारण्यावर भर देणार, कर्मचारीवाढीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’
मडगाव : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. विविध वॉर्ड आणि विभागांना भेटी देऊन तसेच ऊग्णांशी संवाद साधून या इस्पितळात दिल्या जाणाऱ्या सेवांचा त्यांनी आढावा घेतला. या इस्पितळात कार्डिओलोजी, न्युरोलोजी प्रक्रिया 4 ते 5 महिन्यांत सुरू होणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. राणे यावेळी म्हणाले की, दक्षिण गोव्यातील लोकांना सर्वोच्च सुविधा आणि उपचार देण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. ते अद्ययावत इस्पितळात विकसित व्हायला हवे आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सेवा सुधारण्यावर आपला भर राहणार आहे.
अधिक वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका आणून कर्मचारी संख्या वाढविण्याबाबत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याशी आपण सर्वोच्च प्राधान्याने चर्चा करणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ओपीडीत सरासरी भरपूर ऊग्ण येत असल्याने आवश्यक सुविधांनी युक्त असे हे जिल्हा इस्पितळ बनविण्यात येणार आहे. गोमेकॉत असलेली रक्ततपासणी सुविधा येथे पुरविण्यात येणार आहे. आपल्याला प्रसिद्धीची खाज नसून विधानसभेत या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला भेट देऊन आढावा घेण्याचे तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आपण दिले होते. त्याअनुषंगानेच ही भेट आपण दिली आहे. आपण एकटेच आलो असून आरोग्य संचालकांना घेऊन येथील बाबी जागेवर घातल्या जाणार आहेत, असे मंत्री राणे यांनी पत्रकारांशी बोलताना नंतर सांगितले.