कणकवली,देवगड,वैभववाडी रुग्णालयात अधीक्षक,तज्ज्ञ डॉक्टरांची पदे तातडीने भरणार
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आमदार नितेश राणे यांना आश्वासन
कणकवली /प्रतिनिधी
कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि देवगड व वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात अधीक्षक आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पदे लवकरच भरली जातील. वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक आणि अतांत्रिक कर्मचारी महिना - दीड महिन्यात नियुक्त केले जातील. काही डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची नव्याने भरती केली जाईल. तर काही पदे बदली प्रक्रियेतून भरली जातील. कणकवली विधानसभा मतदारसंघात आरोग्याच्या संदर्भात कोणत्याच तक्रारी येणार नाहीत अशा पद्धतीची सेवा आपण देऊ असे आश्वासन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत आमदार नितेश राणे यांना दिले.
कणकवली मतदार संघातील कणकवली, देवगड, वैभववाडी या तिन्ही तालुक्यातील आरोग्यसेवा दर्जेदार करण्यासाठी आणि रिक्त पदे भरण्या संदर्भात भाजप आमदार नितेश राणे यांच्या आग्रहास्तव नागपूर विधान भवनात बैठक झाली.
यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. म्हैसकर, आयुक्त डॉ. धीरज कुमार, आरोग्य संचालक डॉ. कंदेवाड, उप संचालक डॉ.दिलीप माने, सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व या विषयाशी संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते.कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे अधीक्षक आणि तज्ञ डॉक्टर यांच्या नियुक्ती तातडीने केल्या जातील. त्याचप्रमाणे देवगड ग्रामीण रुग्णालयात सुद्धा रिक्त असलेली पदे भरली जातील. वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाची ही सर्व पदे भरली जातील त्यातील काही पदेही या महिन्यातच पूर्ण केली जातील, तर काही बदल्या प्रक्रियेतून येत्या दोन महिन्यात रिक्त जागी नवीन अधिकारी आणि डॉक्टर नियुक्त केले जातील. डॉक्टर नसल्यामुळे आरोग्य सेवेचा जो खोळंबा होत आहे तो होणार नाही आणि चांगली सेवा प्रत्येक रुग्णाला मिळेल असा अशा पद्धतीची व्यवस्था या प्रत्येक रुग्णालयात करून देण्याचे विश्वास आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले.