आरोग्यमंत्री राणे यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
गोव्यात खळबळ, राजकीय चर्चेला उधाण
पणजी : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी अचानक काल गुरुवारी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने गोव्यात एकच खळबळ माजली आणि राजकीय चर्चेला उधाण आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी असलेले देशाचे प्रमुख नेते आहेत. त्यांना सुखी आरोग्य आणि यश लाभावे ही आपल्या कुटुंबीयांची भावना आहे. या भावनेतूनच आपण पंतप्रधानांची भेट घेतली. मोदीजी आपले गुरू असल्याने त्यांच्याशी बोलल्यानंतर मन भरून येते. वडील प्रतापसिंह राणे व आई विजयादेवी राणे यांनी मोदी यांचे खास तयार करून घेतलेले तैलचित्र देण्यासाठी आपण त्यांना भेटलो, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी या भेटीनंतर एक्सवर दिली. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशात तसेच विविध राज्यांत यश मिळालेले आहे. यापुढेही यश लाभावे आणि देशाचा विकास व्हावा ही आमच्या कुटुंबीयांची मनिषा आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनाही भेटून आरोग्यमंत्री राणे यांनी चर्चा केली.