आरोग्यमधील 27 वैद्यकीय अधिकारी बडतर्फ
एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (गट-अ) सेवा समाप्त केल्या आहेत.
By : कृष्णात चौगले
कोल्हापूर : परिविक्षाधीन कालावधीत एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अनधिकृतपणे गैरहजर असलेल्या राज्यातील 442 वैद्यकीय अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. राज्यस्तरीय वैद्यकीय केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमधील हे वैद्यकीय अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (गट-अ) सेवा समाप्त केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर आरोग्य उपसंचालक मंडळातील (कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) 27 वैद्यकीय अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या तरतुदीनुसार परिविक्षाधीन कालावधीत नैमित्तीक रजा वगळून अन्य कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करताना त्याचा परिविक्षाधीन कालावधी रजेच्या कालावधी इतका अथवा एक वर्षासाठी वाढविण्याची तरतूद आहे. तसेच परिविक्षाधीन कालावधीत उमेदवार 7 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी समर्थनीय कारणाशिवाय गैरहजर राहिल्यास त्याची सेवा समाप्त करण्याची तरतूद आहे. त्यानुसार राज्यातील कामचुकार डॉक्टरांवर कारवाई केली आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेत मनमानी कारभार करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.
कोल्हापूर आरोग्य उपसंचालक मंडळांतर्गत डॉ. डी. व्ही. क्षीरसागर, डॉ. नितीन मारुतीराव ढोबळे, डॉ. अभिजीत नारायण कांबळे, डॉ. प्रशांत पुंडलिक म्हसवेकर, डॉ. रियाज अमिनोद्दीन अत्तार, डॉ. आरती दत्ता गलाले, डॉ. एम. जी. शहाणे, डॉ. आनंद ज. निकम, डॉ. लक्ष्मीकांत बळीराम यादव, डॉ. संस्कृती राठोड, डॉ. ज्योती जितेंद्र गुप्ता, डॉ. गिरीश मनोहर चव्हाण, डॉ. सचिन बापूसाहेब खंडागळे, डॉ. शुभम अनिल पवार, डॉ. उप्लेश संतोष महाजन, डॉ. आयेशा गणी शेख, डॉ. ऋषिकेश रमेशराव अडबलवार, डॉ. अमित चंद्रकांत पाटील, डॉ. प्रबोधन जेडगे, डॉ. प्रणोती संभाजी पाटील, डॉ. शौनक रुकडीकर, डॉ. नीलेश प्रदीप शिरगावकर, डॉ. मनजित बाळकृष्ण उके, डॉ. शितल अशोकराव सिध्देवाड, डॉ. शिवकुमार बालाजी आकुलवाड, डॉ. पूजा सोनवणे, डॉ. प्रणाम केंद्रे या 27 वैद्यकीय अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे.
खासगी प्रॅक्टीसला प्राधान्य, सार्वजनिक सेवेला दुय्यम स्थान
बडतर्फ केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी अनेकांची खासगी हॉस्पिटल्स असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी सार्वजनिक सेवेला दुय्यम स्थान देत आपल्या हॉस्पिटलकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांवर ही कारवाई केली आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यात आरोग्यसेवा आयुक्त कार्यालयाने पाठविला होता. अंतिम प्रस्ताव 4 एप्रिल रोजी पाठविला. 16 एप्रिल रोजी बडतर्फीचा आदेश काढण्यात आला.
सापडला तर चोर...
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार रुग्णांची हेळसांड करणाऱ्या कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त केली असली तरी अद्याप खासगी प्रॅक्टीस करणारे अनेक वैद्यकीय अधिकारी मोकाट आहेत. दुपारपर्यंत सार्वजनिक रुग्णालयात थांबायचे आणि त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांकडे रुग्णालयाची सर्व जबाबदारी सोपवून आपल्या खासगी रुग्णालयाकडे लक्ष केंद्रित करायचे असा त्यांचा नित्य उपक्रम आहे. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी याबाबत सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिल्यास सार्वजनिक आरोग्य सेवा कमी आणि स्वत:च्या खासगी हॉस्पिटलची सेवा जास्त करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कारनामे उघडकीस येतील. पर्यायाने शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची हेळसांड थांबेल.
आरोग्यमंत्र्यांचा धाडसी निर्णय
सार्वजनिक आरोग्य सेवेत सतत गैरहजर असणाऱ्या कामचुकार डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबतचा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा धाडसी निर्णय आहे. रुग्णसेवा देत नसलेले हे डॉक्टर कागदोपत्री प्रशासकीय दप्तरी दिसत असल्यामुळे त्या ठिकाणी नवीन डॉक्टरांची भरती देखील करता येत नव्हती. पण आता कामचुकार डॉक्टरांची सेवा समाप्त केल्यामुळे नवीन डॉक्टरांची भरती करण्याचा मार्ग खुला झाला आहे, असे मत आरोग्य सेवेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.
शासनाची चांगली कारवाई, नवीन पदभरती करता येणार
"राज्यात परिविक्षाधीन कालावधीत समर्थनीय कारणाशिवाय गैरहजर राहिलेल्या डॉक्टरांची सेवा समाप्त करण्याबाबतचा शासनाचा हा चांगला निर्णय आहे. त्यामुळे डॉक्टरांची नवीन पदभरती करता येणार असून रुग्णसेवेला अधिक गती मिळणार आहे."
- डॉ. दिलीप माने, आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर
प्रादेशिक विभागनिहाय बडतर्फ वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या
- कोल्हापूर.....27 नागपूर.....84
- अकोला.......75 ठाणे.........48
- लातूर............85 पुणे..........28
- संभाजीनगर..23 नाशिक....66