स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा आ. निलेश राणेंच्या हस्ते शुभारंभ
मालवण - पेंडूर ग्रामीण रुग्णालयात केले होते आयोजन
(छाया / विशाल वाईरकर)
कट्टा/वार्ताहर
राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडविण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी, उपचार सेवा आणि पोषण यावर विशेष भर देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय पेंडूर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. निलेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.डी. पोळ, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, दादा साईल, दीपक पाटकर, संतोष साठविलकर, वरची गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, पेंडूर सरपंच नेहा परब, राजन माणगावकर, आतिक शेख, शेखर फोंडेकर, विनीत भोजने, शाम आवळेगावकर, अमित सावंत, सागर माळवदे, नंदकुमार परब व अन्य ग्रामस्थ, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. निलेश राणे यांनी सदर शिबिरात महिला भगिनींना कोणकोणत्या वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहेत याची माहिती घेतली. तसेच यावेळी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाची व शिबिराला आलेल्या महिला वर्गाची विचारपूस केली. त्याचबरोबर रुग्णालयातील अन्य समस्या, सोई सुविधा यांचा आढावा घेतला. याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. निलेश राणे म्हणाले की आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे. आरोग्याच्या दृष्टीने माणूस सुदृढ असेल तर कोणत्याच प्रकारच्या समस्या निर्माण होत नाही. त्यात करून घरची स्त्री ही जर सशक्त असेल निरोगी असेल तर घराची प्रगती होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने हाती घेतलेला हा उपक्रम मोठा टप्पा असून राज्याच्या विकासात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. याचा लाभ जास्तीत जास्त महिला व माता भगिनी यांनी घ्यावा असे आवाहन केले.या शिबिरात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे तसेच निरोगी जीवनशैली आणि पोषण, आरोग्य सेवा घेणे सोपे करण्यासाठी नागरिकाचा सक्रिय सहभाग असणे याबाबत माहिती देऊन अभियानातील अन्य सर्व आरोग्य सेवाची माहिती देण्यात आली. तसेच याबाबत अधिक माहिती हवी असल्यास ग्रामीण रुग्णालयात प्रत्यक्ष भेट द्यावी.