For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेड, स्मिथ यांची शानदार शतके

06:58 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
हेड  स्मिथ यांची शानदार शतके
Advertisement

ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर 134 धावांची आघाडी, कार्सचे 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

ट्रॅव्हिस हेडचे मालिकेतील तिसरे शतक, कर्णधार स्टीव्ह स्मिथचे नाबाद शतक, लाबुशेन व वेबस्टर, ग्रीन यांच्या उपयुक्त खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील पाचव्या व शेवटच्या कसोटीत तिसऱ्या दिवशी इंग्लंडवर 134 धावांची आघाडी घेतली. हेडने 163 धावा जमविल्या तर स्मिथ 129 धावांवर खेळत असून ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर 7 बाद 518 धावा जमविल्या होत्या.

Advertisement

इंग्लंडने पहिल्या डावात 384 धावा जमविल्या होत्या तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशीअखेर 2 बाद 166 धावा जमविल्या होत्या. हेडने नाबाद 91 धावांवरून तिसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात केली आणि त्याने 166 चेंडूंच्या खेळीत 163 धावा फटकावल्या. त्याचे या मालिकेतील हे तिसरे शतक आहे. याआधी त्याने पर्थमधील पहिल्या कसोटीत 123 तर अॅडलेडमधील तिसऱ्या कसोटीत 170 धावा जमविल्या होत्या. फॉर्म गवसलेल्या स्मिथने या मालिकेत 61 ही सर्वोच्च धावसंख्या जमविली होती. पण यावेळी त्याने 205 चेंडूत नाबाद 129 धावा जमवित त्याची भरपाई केली. त्याचे हे अॅशेसमधील 13 वे आणि एकंदर 37 वे शतक आहे. याशिवाय सिडनी मैदानावरील त्याचे हे पाचवे शतक आहे. कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक शतके नोंदवणाऱ्यांच्या यादीत तो आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

हेडचा धडाका

शेवटची कसोटी खेळणाऱ्या उस्मान ख्वाजाला 17 धावा काढून बाद झाल्यानंतर प्रेक्षकांनी मानवंदना दिली तर फटकेबाज शतक नोंदवल्यानंतर बाद झालेल्या हेडलाही त्यांनी उभे राहून मानवंदना दिली. 15 वर्षांपूर्वी ख्वाजाने याच मैदानावर कसोटी पदार्पण केले होते. हेडने 105 चेंडूत 17 वा चौकार ठोकत शतक पूर्ण केले. त्याला 121 धावांवर एक जीवदानही मिळाले होते. अॅशेसच्या एकाच मालिकेत तीन शतके नोंदवणारा तो मॅथ्यू हेडननंतरचा पहिला सलामीवीर आहे. हेडनने 2002-03 मोसमात हा पराक्रम केला होता.

हेडनने जीवदान मिळाल्यानंतर थोडा सावध खेळ केला. पण नाईट वॉचमन मायकेल नेसर (24) बाद झाल्यानंतर त्याने धावांचा वाढवला. हेड-नेसर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी केली. हेडने षटकार व चौकार ठोकत 152 चेंडूत दीडशतक गाठले. दुसऱ्या सत्रात तो 163 धावांवर बाद झाला. त्यात एकूण 24 चौकार, 1 षटकाराचा समावेश होता.

स्मिथचे 37 वे शतक

यानंतर स्मिथने ताबा घेत ख्वाजासमवेत 51, अॅलेक्स कॅरीसमवेत 27 व कॅमेरॉन ग्रीनसमवेत 61 धावांची भागीदारी केल्या. ग्रीनने 37 धावा केल्या. स्मिथने 166 चेंडूत शतकी मजल मारली. दिवसअखेर तो 129 धावांवर खेळत असून बॉ वेबस्टर 42 धावा काढून त्याला साथ देत आहे. या जोडीने आठव्या गड्यासाठी अभेद्य 81 धावांची भागीदारी केली आहे. चौथ्या दिवशी आघाडी जास्तीत जास्त वाढवून इंग्लंडवर दुसऱ्या डावात दडपण आणण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न राहील. इंग्लंडच्या ब्रायडन कार्सने 3, स्टोक्सने 2 तर जोश टंग व जेकब बेथेल यांनी एकेक बळी मिळविला आहे.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव 384, ऑस्ट्रेलिया प.डाव 7 बाद 518 : हेड 166 चेंडूत 163, वेदराल्ड 21, लाबुशेन 48, नेसर 24, स्मिथ खेळत आहे 129, उस्मान ख्वाजा 17, कॅरी 16, ग्रीन 37, बॉ वेबस्टर खेळत आहे 58 चेंडूत 42, अवांतर 21. ब्रायडन कार्स 3-108, स्टोक्स 2-87, टंग 1-89, बेथेल 1-50.

अॅशेसमध्ये सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजांत दुसऱ्या स्थानी

अॅशेसच्या इतिहासात सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजांत स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने या डावात इंग्लंडच्या जॅक हॉब्स यांना मागे टाकले. हॉब्स यांनी 41 कसोटीतील 71 डावांत 3636 धावा जमविल्या होत्या. 54.26 च्या सरासरीने त्यांनी या धावा जमविल्या होत्या. त्यात 12 शतके व 15 अर्धशतकांचा समावेश होता. स्मिथने 41 सामन्यातील 73 डावांत 3644 धावा जमविल्या आहेत. 56.93 अशी त्याची सरासरी असून 13 शतके व 15 अर्धशतकांचा त्यात समावेश आहे.

सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजांत दिवंगत सर डॉन ब्रॅडमन पहिल्या स्थानावर आहेत. त्यांनीड 37 कसोटीतील 63 डावांत 5028 धावा जमविताना 89.78 अशी सरासरी गाठली होती. त्यात 19 शतके व 12 अर्धशतकांचा समावेश होता.

अॅशेस मालिकेत सर्वाधिक धावा जमविणाऱ्यांत इंग्लंडचा जो रूट आठव्या स्थानावर आहे. त्याने 39 सामन्यांत 74 डावांत 41.50 च्या सरासरीने 2822 धावा जमविल्या आहेत. त्यात 6 शतके व 18 अर्धशतकांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.