जगाला अडचणीत आणणारे महायुद्ध !
संपूर्ण जगाने आपल्या तालावर नाचावे असे वाटून आज संपूर्ण जगाला आर्थिक सामाजिक व अन्य क्षेत्रात अडचणीत आणणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आखाती राष्ट्रांमध्ये जे महायुद्ध पेटवून दिलेले आहे त्यातून अनेक गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. आता हा सारा खेळ त्यांच्या अंगलटच येऊ लागलेला आहे. इस्रायलच्या मदतीने इराणवर जोरदार हल्ले चढवून इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला खोमेनी यांची हत्या केल्यानंतर सारे प्रश्न मिटतील, या भ्रमात राहिलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना कल्पना नव्हती की इराणदेखील तेवढ्याच तयारीनिशी उतरलेला आहे. गेले काही दिवस हे युद्ध चालू आहे. आज युद्धाचा बारावा दिवस आणि एवढे प्रचंड नुकसान होऊन, राष्ट्राचा सर्वेसर्वा जाऊन देखील इराण काही डगमगले नाही. उलटपक्षी अनेकांच्या चाव्या हातात घेऊन इराणने आपल्या खाडीतून तेलाच्या बोटी जाण्यास जे निर्बंध लागू केले, त्यातून अनेक देशांच्या गंभीर समस्या उद्भवलेल्या आहेत. आखाती राष्ट्रांमध्ये युद्ध पेटवून डोनाल्ड ट्रम्प इराण आपल्या हातात घेऊ पाहत आहे. सारी लढाई ही केवळ तेलासाठी आहे, हे स्पष्ट आहे. डोनाल्ड ट्रम्प स्वत:ला फार हुशार समजतात मात्र शेरास सव्वाशेर देणारी माणसे देखील जगात आहेत हे या युद्धातून स्पष्ट होते. मंगळवारी एका बाजूने युद्ध समाप्तीची घोषणा करायची आणि दुसऱ्या बाजूने हार्मोझ समुद्रातून तेल वाहतूक बंदी हटविली नाही तर इराणचा अंत:काळ एकदम समीप आला अशी टिपणी करायची, हा प्रकार म्हणजे दुतोंडी ठरतो. मात्र इराणच्या मदतीला रशिया आले आहे आणि त्याचबरोबर आता दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी देखील इराणला वाटेल ती मदत करण्याचे जाहीर केले आहे. यातून आता तिसऱ्या महायुद्धाचे ढग डोनाल्ड ट्रम्पमुळे आणखी गडद झाले आहेत. अमेरिकेतून आलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील अनेक मोठ्या उद्योजक, व्यापारी, समाजसुधारक व राजकीय नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना युद्ध संपवा असा सल्ला दिलेला आहे आणि युद्ध समाप्ती करणे हेच अमेरिकेला परवडणार, अन्यथा अमेरिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक होईल, सध्या ती नाजूक होण्याच्या मार्गावरच आहे. याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे, त्यातून डोनाल्ड ट्रम्प यांना थोडीतरी सद्बुद्धी येईल, अशी अपेक्षा आहे. ट्रम्प यांना युद्धाची खुमखुमी आहे. अमेरिकेतील मोठ्या प्रमाणात युद्ध सामग्री अनेक आखाती देशांमध्ये त्याचबरोबर इस्रायलमध्ये पोहोचविली आहे. या युद्धाचे आज आपण जे परिणाम पाहतो आहोत, त्याहीपेक्षा भविष्यात त्याचे अति भयानक परिणाम आपल्याला पाहायला मिळतील आणि जास्तीत जास्त गंभीर परिणाम हे भविष्यात अमेरिकेला भोगावे लागणार आहेत. यापूर्वी अमेरिकेवर फार मोठे अतिरेकी हल्ले झालेले आहेत. आता यानंतर आयातुल्ला खोमेनी यांच्या हत्येचा जो कट रचण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली, त्याचा बदला घेतल्याशिवाय मुस्लिम समाज गप्प बसेल असे मुळीच वाटत नाही. एवढेच नव्हे तर जागतिक स्तरावर युद्ध निर्माण करण्याची सारी कल्पना ही ट्रम्प यांचीच आहे, त्यामुळे अमेरिकेत ट्रम्प यांच्यावर प्रखर टीका सध्या होत आहे. जगातील अनेक राष्ट्रांमध्ये सध्या भयानक वातावरण निर्माण झालेले आहे. आखाती राष्ट्रांमध्ये जी शांतता होती ती ट्रम्प यांनी भंग करून टाकलेली आहे. इराणने यापूर्वी कधीही आखाती राष्ट्रांवर फारसे हल्ले चढवलेले नाहीत. यापूर्वी इराक आणि इराण यांच्यामध्ये काही वर्षांपूर्वी फार मोठे युद्ध पेटले होते आणि हे युद्ध संपुष्टात आणताना अनेक राष्ट्रांना त्यामध्ये लक्ष घालणे गरजेचे पडले. त्या काळात अमेरिका इराणची बाजू घेत होते आणि आता इराणला संपवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच पुढाकार घेतलेला आहे. मात्र सध्याचे युद्ध आणखी थोडे दिवस सुरू राहिल्यास त्याचा सर्वाधिक फटका इराणपेक्षाही अमेरिकेलाच बसणार आहे. सध्या तरी अमेरिकेला आर्थिक प्रचंड फटका बसलेला आहे. त्यातच अमेरिकेचे अनेक राष्ट्रांमधील तळ हे इराणने उद्ध्वस्त केलेले आहेत. आता हे युद्ध अचानक थांबविणे ट्रम्प यांना शक्य होत नाही. त्यामुळे या युद्धातून खऱ्या अर्थाने जर कोणाची गंभीर अडचण निर्माण झालेली असेल तर ती डोनाल्ड ट्रम्प तसेच अमेरिकेची देखील. आता या परिस्थितीतून माघार घेणे हे जास्त त्रासदायक ठरते, त्यामुळे अन्य कोणत्यातरी देशांना पुढाकार घेऊन मध्यस्थी करून हे युद्ध थांबविण्याचे नाटक रचले जात आहे. आपणच साऱ्या विश्वाचा तारक आहे, अशा पद्धतीचा आव आणण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केला खरा परंतु हळूहळू डाव अमेरिकेवरच उलटत आहे. या युद्धामुळे अमेरिकेचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे. या युद्धामुळे इराण माघार घेईल आणि त्यानंतर त्या राष्ट्रावर आपणच अधिराज्य करू, असा ट्रम्प यांचा इरादा होता तो साध्य झालेला नाही, उलटपक्षी यांच्यामुळेच हे युद्ध पेटले आणि आखाती राष्ट्रांचे देखील अतोनात नुकसान झालेले आहे. आखाती राष्ट्रांनी इराणशी शत्रुत्व पत्करले. साऱ्या आखाती राष्ट्रांमध्ये सध्या गोंधळ माजलेला आहे. कधी नव्हे तो जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ तेथील नागरिकांवर आलेली आहे. सर्वच बाजूने नुकसान तर झालेले आहेच, शिवाय आता हातात पैसे असून देखील उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे. यातून ट्रम्प यांचा जो कुटील डाव होता तो आता आखाती राष्ट्रांना कळून चुकलेला आहे. त्यामुळेच ही राष्ट्रे देखील अकारण अमेरिकेच्या नादी लागलो, या विचारात आहेत. भारत जरी तटस्थ भूमिका घेत असला तरी देखील आता दहा दिवसानंतर युद्धाच्या झळा देशाला बसू लागल्या. भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये कोविडमध्ये जशी लॉकडाऊनची वेळ आली होती, तशीच वेळ त्यांच्यावर आलेली आहे. भारतामध्ये देखील अशी वेळ येऊ शकते. सध्या गॅस पुरवठा होत नसल्याने अनेक हॉटेले बंद पडू लागली आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. इराणशी युद्ध हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी कदाचित मनोरंजनाचा विषय असू शकतो, परंतु अर्धेअधिक जग सध्या गंभीर समस्यांना तोंड देत आहे. हे युद्ध त्वरित थांबविणे अत्यंत गरजेचे आहे. दक्षिण कोरियाने यात लक्ष घालून अमेरिकेला चांगलाच दणका दिलेला दिसतोय. आता तरी युद्ध थांबविणे याशिवाय दुसरा कोणताही पर्याय ट्रम्पसमोर असणार नाही. युद्ध हा खेळ नसून तो तर मानवाशी केलेला क्रूर खेळ आहे. सर्व राष्ट्रे एकसंघ राहिली तर अमेरिकेचे पुढे काय होईल! याचा विचार त्या देशाला करावाच लागेल.